नागपूर: नागपूर हिट अँड रन प्रकरणातील ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांची होती. एवढेच नव्हे तर अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये उपस्थित असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याप्रकरणावरुन आणखी राजकारण पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांनी अपघातानंतर कारमध्ये उपस्थित असलेल्या अर्जुन हावरे (Arjun Hawre) आणि रोनित चिंतमवार यांची वैद्यकीय चाचणी केली. मात्र, अद्याप संकेत बावनकुळेची वैद्यकीय चाचणी केलेली नाही. हा मुद्दाही पुढे राजकीय गदारोळाचा कारण बनू शकतो.
नेमकं काय घडलं?
रविवारी मध्यरात्री नागपूरच्या रामदास पेठ परिसरात हॉटेल सेंटर पॉईंटजवळ दोन कार आणि एका दुचाकीला धडक देणारी हीच ती ऑडी कार नुकतीच खरेदी करण्यात आली होती. ही ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या नावावर रजिस्टर आहे. सुरुवातीला पोलिसांनी या कारमध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार हे उपस्थित असल्याचे सांगितले होते. मात्र, काल रात्री नागपूर पोलिसांनी संकेत बावनकुळे याची पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी केली आणि त्यानंतर आज सकाळी आतापर्यंत झालेल्या तपासाच्या आधारावर अपघातावेळी संकेत बावनकुळे ही कारमध्ये उपस्थित असल्याचा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घटनेच्या वेळेला अर्जुन हावरे हा कार चालवत होता. तर संकेत बावनकुळे समोरच्या सीटवर त्याच्या शेजारी बसलेला होता, तर रोनीत चिंतमवार मागील सीटवर बसला होता, अशी माहिती झोन 2 चे उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.
वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे विरोधात कोणत्या गुन्ह्यांची नोंद
281 - भरधाव आणि निष्काळजी ने वाहन चालवणे
125 ए - इतरांचा जीवन धोक्यात आणणे...
324 (2) - इतरांच्या वाहनांचे नुकसान करणे..
185- मद्यप्राशन करून वाहन चालविणे
सीसीटीव्ही फुटेजमधून काय समोर येणार?
पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे घटनेच्या दिवशी संकेत बावनकुळे अर्जुन हावरे आणि ऋणीत चिंतनवार हे तिघेही नागपूरच्या धरमपेठ परिसरातील लाहोरी रेस्टॉरंट आणि बार मध्ये जेवण करायला गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास तिघे त्या ठिकाणी पोहोचले. अर्धा तासानंतर आपल्या ऑडी कारने धरमपेठ वरून रामदास पेठेच्या दिशेने निघाले होते आणि त्याच वेळी हा अपघात झाला.
घटनेच्या समोर आलेल्या सीसीटीव्ही प्रमाणे घटनेच्या काही क्षणापूर्वी ऑडी कारची गती खूप जास्त नव्हती, हे दिसून येत आहे. मात्र, ऑडी कारने समोर हळुवार चाललेल्या इतर कारला पाठीमागून धडक दिली हे स्पष्ट दिसत आहे.
पोलिसांनी मद्य प्राशन करून बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी अर्जुन हावरे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याचे सहप्रवासी संकेत बावनकुळे आणि रोनित चिंतमवार यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल केलेले नाही. संकेत बावनकुळे याची तर वैद्यकीय चाचणी ही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मुद्द्यावर राजकीय गदारोळ होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून याप्रकरणी गंभीर आरोप होत असले तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी आणि सत्य समोर आणावं असे मत व्यक्त केले आहे..
पोलिसांनी याप्रकरणी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारचा डीव्हीआर ताब्यात घेतलं असून त्यामधूनही पुरावे तपासले जात आहेत. त्यामुळे याप्रकरणी भविष्यात आणखी काही वेगळे सत्य समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तोवर या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू राहतील, अशी चिन्हं दिसत आहेत.
VIDEO: नागपूर हिट अँड रन केस
आणखी वाचा