Nagpur Accident News नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर हे सर्वार्थानं सुरक्षित असे शहर असल्याचे सांगण्यात येतं. इथल्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांची करडी नजर असून शहरात हजारो कॅमेऱ्यांनी सज्ज आहे. मात्र, याच स्मार्ट सिटी नागपूरमध्ये (Nagpur) एक निर्दोष महिला आपल्या मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉक करायला निघाली असता या महिलेला एक कारने बेदरकारपणे अक्षरक्ष: उडवलं. त्यानंतर ही कार इथवरच थांबली नाही तर नंतर तिला कारच्या चाकाखाली दोनदा अमानुषपणे चिरडलेही.7 मे ला सकाळच्या सुमारास ही थरारक घटना घडली.


मॉर्निंग वॉकला गेलेल्या ममता आदमने यांना चिरडणाऱ्या कार आणि या कार चालकाचा शोध लावण्यात मात्र पोलीस (Nagpur Police) तीन आठवड्यानंतर ही अपयशी ठरले आहेत. या अपघातात ममता आदमने यांचे अनेक हाड फ्रॅक्चर झाले असून अद्याप त्या अंथरुणावरच पडून आहेत. या घटनेमुळे स्मार्ट सिटी नागपूरातील सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे परत एकदा कूचकामी ठरल्याचे यातून निष्पन्न झाले आहे. 


दोषी तीन आठवड्यानंतरही मोकाटच! 


ही घटना आहे 7 मे च्या सकाळी 6:30 वाजताची. गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत शारदा चौक जवळ ममता आदमने आपल्या मैत्रिणीसह मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. दरम्यान, अचानक पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि तिने दोघींना जोरदार धडक दिली. यात ममता यांची मैत्रीण कारच्या धक्क्याने बाजूला फेकली गेली. तर ममता यांना कारच्या बोनटची जोरदार धडक लागल्यामुळे त्या समोरच्या दिशेने अनेक फूट लांब फेकल्या गेल्या आणि परत त्याच कार ने ममता आदमने यांना दोनदा चिरडले. या अपघातानंतर बेजबाबदार कारचालक तिथून लगेच पळून गेला. 


अद्याप अंथरुणाला खिळून


अपघातात गंभीर जखमी झालेल्या ममता आदमने यांना टप्प्याटप्प्याने दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीराच्या अनेक हाड या अपघातात तुटल्या. त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ममता आदमने यांचा जीव तर वाचवलाय. मात्र प्रचंड वेदनेत ममता आदमने सध्याही अंथरुणाला खिळून आहेत. डॉक्टरांच्या मते पुढील तीन महिने त्या आपल्या पायावर उभे राहू शकणार नाही आणि चालूही शकणार नाहीयेत. त्यानंतर पुन्हा सामान्य जीवन जगण्यासाठी त्यांना अनेक महिने वाट पाहावी लागणार आहे.


शारीरिकपेक्षा मानसिक वेदनाच जास्त


मात्र, ममता आदमने यांची शारीरिक वेदना कमी असून मानसिक वेदनाच जास्त आहे. कारण उपराजधानी नागपूरचे पोलीस आजवर त्या दोषी कार चालकाला शोधू शकले नाही. 7 मे च्या या अपघाताला आता तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र, अजूनही नागपूर पोलीस आणि पोलीस स्टेशनचे पथक दोषी कारच्या चालकाला शोधण्यात यशस्वी झालेले नाही. परिणामी, या प्रकरणाची विचारणा केली असता आमची चौकशी सुरू आहे, कार चालकाचा शोध सुरू आहे. एवढंच पोलिसांचा उत्तर आहे.


इतर महत्वाच्या बातम्या