सांगली : नातीचा वाढदिवस करून घरी येत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट रिकाम्या कालव्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये घडली. मध्यरात्री रिकाम्या कालव्यात कार कोसळल्यानंतर वेळेत मदत न मिळाल्याने जखमींचा मृत्यू झाला आहे. सांगलीमधील तासगाव- मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात एकमेव बचावलेल्या महिलेची सुद्धा प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत
या अपघातात राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय 56),पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील (वय 52, रा. तासगाव) मुलगी प्रियांका अवधूत खराडे (वय 33), नात दुर्वा अवधूत खराडे (वय 5), दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे (वय एक, सर्व रा. बुधगाव) आणि राजवी विकास भोसले (वय 2) रा. कोकळे यांचा जागीच मृत्यू झाला. मृत राजेंद्र पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीर जखमी आहे. अपघातग्रस्त अल्टो कार राजेंद्र पाटील चालवत होते.
मदतीसाठी आक्रोश, पण पहाटेपर्यंत कोणीच आलं नाही
मृत कुटुंबातील बचावलेल्या स्वप्नाली भोसले यांची मुलगी राजवीचा वाढदिवस होता. त्यासाठी सर्व कुटुंब वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वप्नाली यांच्या सासरी कोकळे गावी गेले होते. मंगळवारी रात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर जेवण करून तासगावकडे येण्यासाठी रात्री उशिराने अल्टो कारमधून (एमएच-10-एएन-1097) येत होते. कार राजेंद्र पाटील चालवत असताना मणेराजुरी रस्त्याजवळील कालव्याजवळ आले असता राजेंद्र पाटील यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रिकाम्या कालव्यामध्ये कोसळली.
अपघात मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला असल्याने बचावलेल्या एकमेव स्वप्नाली यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, कोणाला येता आलं नाही. त्यामुळे जखमींना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी मॉर्निंग वाॅकसाठी गेलेल्या लोकांना कालव्यातून महिलेचा आवाज येत असल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजले. त्यांनी स्वप्नाली यांना कालव्यातून बाहेर काढले व घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतरह सर्व मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले.
राजेंद्र पाटील सहकुटुंब नात राजवीच्या वाढदिवसासाठी पत्नी मुलगी आणि नातींसह गेले होते. त्यांनी आनंदाने नात राजवीचा दुसरा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस पार पडल्यानंतर आजोबांसोबत आजोळी जात असतानाच काळाने कुटुंबावरच घाला घातला. त्यामुळे काही क्षणांमध्ये कुटुंबाचा उद्ध्वस्त झाले.
इतर महत्वाच्या बातम्या