Nagpur Crime नागपूर: अल्पवयीन मुलीच्या मदतीने दोन महिलांनी मिळून एका महिलेचे दिवसाढवळ्या दागिने लंपास (Nagpur Crime) केले आहे. ही घटना तहसील पोलीस ठाण्याच्या (Nagpur Police) हद्दीतील नालसाहब चौकात घडली. लक्ष्मी नामदेव मुंदेकर (वय 52, रा. जुनी मंगळवारी) असे या महिलेचे नाव असून अधिक पैशाचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक(Crime)करण्यात आली आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या अज्ञात माहिलांविरोधात तहसील पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तिघींचा शोध सुरू केला आहे.


अल्पवयीन मुलीच्या मदतीने पळविले महिलेचे दागिने


नागपूरच्या जुनी मंगळवारी परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी मुंदेकर या रविवारच्या सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्या फळभाजी खरेदी करण्यासाठी लकडगंज येथे गेल्या. याच दरम्यान, एक 12 वर्षांची मुलगी त्यांच्याजवळ आली आणि 'मी उज्जैन येथून आली आहे. मी रस्ता चुकली असून, उपाशी आहे', असे म्हणत मुलीने 500 रुपयांची नोट असलेले बंडल त्यांना दाखविले. ही रक्कम एटीएममध्ये जमा करायचे असल्याचे तिने सांगितले.


इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम बघून लक्ष्मी मुंदेकर यांना विश्वास बसला. दरम्यान, त्या मुलीसोबत बोलत असतानाच दोन महिला त्यांच्याजवळ आल्या. बोलताना त्यांना देखील हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी मिळून योजना तयार केली आणि आपण या मुलीला खायला देऊन तिच्याकडील पैसे आपण तिघी वाटून घेऊ, असे त्या दोघी लक्ष्मी यांना म्हणाल्या. त्यानंतर चौघीही ई-रिक्षाने डागा हॉस्पिटल चौकात उतरल्या आणि त्यानंतर त्या पायी नालसाहब चौकाकडे जाण्यास निघाल्या. दरम्यान 'मला लवकर घरी जायचे आहे', असे ती मुलगी लक्ष्मी यांना म्हणाली. 'तुझ्याजवळील नोटांची गड्डी आम्हाला दे. आम्ही हे पैसे एटीएमएममध्ये जमा करू', असे दोन महिला त्या मुलीला म्हणाल्या. त्यावर 'मला तुमच्यावर विश्वास नसल्याचे ती मुलगी त्यांना म्हणाली.  


महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल


मुलीचा विश्वास संपादन करण्यासाठी दोघी महिलांनी त्याच्याजवळील दागिने काढले. तसेच लक्ष्मी यांनाही त्यांच्याजवळील 60 हजार रुपये किमतीचे दागिने काढायला लावून हे दागिने रुमालात ठेवण्यात सांगितले. त्यानुसार लक्ष्मी यांनी आपले दागिने रुमालात ठेवले. त्यानंतर दागिने ठेवण्याच्या बहाण्याने महिलेने दागिने लंपास केले आणि रुमाल व पैशाची गड्डी पिशवीत ठेवली.


पिशवी लक्ष्मी यांच्याकडे देत 'तुम्ही गांजाखेत चौकात जा. आम्ही मुलीला सोडून परत येतो, असे म्हणत त्या दोघी मुलीसह पसार झाल्या. ई-रिक्षाने लक्ष्मी गांजाखेत चौकाकडे जायला निघाल्या. मात्र, वाटेत त्यांना शंका आल्याने त्यांनी रुमाल उघडला असता त्यांना त्यात दगड आढळून आले. सोबतच नोटांच्या गड्डीत केवळ 500 रुपयांची नोट होती, तर त्याखाली कागद होते.


आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लक्ष्मी यांनी त्या महिलांचा शोध घेतला. मात्र त्या महिला लहान मुलीसह पसार झाल्या होत्या. त्यानंतर लक्ष्मी यांनी तत्काळ तहसील पोलीस स्टेशन गाठून पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सध्या पोलीस या तिघींचा शोध घेत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या