नागपूर : नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी एका प्रेमवीर चोराला अटक केली आहे. ऋषभ उर्फ लालू असोपा असे त्याचे नाव आहे. 28 वर्षांच्या ऋषभ असोपाने नागपुरातील विविध भागातून मोठ्या संख्येने दुचाकी चोरल्या आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून 12 दुचाकी जप्तही केल्या आहेत.


विशेष म्हणजे दुचाकी चोरण्यात पटाईत असलेल्या ऋषभ उर्फ लालू हा प्रेयसीचे महागडे हट्ट पुरवण्यासाठी चोऱ्या करायचा. नवनवीन युक्त्या लढवत गाड्या चोरी करण्यात त्याचा हातखंडा आहे. नागपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने शहरातील अनेक पोलीस ठाण्याचे कर्मचारी चोरांच्या मागावर होते. खबऱ्यांमार्फत ऋषभ नावाचा जुना चोर नवनव्या दुचाकीवर फिरताना दिसत असल्याची आणि अलीकडे त्याच्याकडे भरपूर पैसा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ऋषभच्या लोकेशनची माहिती समजताच पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 12 दुचाक्या जप्त केल्या आहे.


प्रेयसी आणि स्वतःचे महागडे शौक पूर्ण करण्यासाठी बाईक चोरीचा धंदा
ऋषभ उर्फ लालू हा जुना गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीसह इतर चोरीचे एकूण 15 गुन्हे दाखल आहे. मात्र, या चोऱ्या पोटापाण्यासाठी नाही तर प्रेयसी आणि स्वतःच्या गरजा (शौक) पूर्ण करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.


वडील आजारी असल्याचं सांगून दुचाकी विक्री
विशेष म्हणजे चोरलेल्या दुचाकी विकताना मात्र तो जबरदस्त ॲक्टिंग करायचा. वडिलांना कॅन्सरचा आजार जडला आहे, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, त्यांच्या औषधांसाठी पैशांची गरज आहे, असे सांगून तो दुचाकी आणि इतर चोरलेल्या वस्तूंची विक्री करायचा किंवा गहाण ठेवत होता.


जेलमधून सुटताच पुन्हा चोरी
ऋषभ उर्फ लालू असोपा हा अनेक वर्षांपासून दुचाकी चोरीच्या क्षेत्रात सक्रिय असल्याने त्याला अनेक वेळा अटकही झाली. काही महिन्यांपूर्वी सुद्धा त्याला दुचाकी चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. मात्र, कारागृहातून सुटका होताच तो पुन्हा वाहन चोरीच्या कामाला लागला होता.


प्रेयसी मला सोडवेल असा विश्वास
आताही सीताबर्डी पोलिसांनी ऋषभ उर्फ लाडूला अटक केल्यानंतर त्याची लवकरच सुटका होईल असा त्याला विश्वास आहे. माझी प्रेयसी मला नक्कीच सोडवेल माझ्या जामिनासाठी चांगला वकील करेल, असा विश्वास ऋषभला आहे.