Nagpur Crime News :  एक नराधम बापाने आपल्या दोन महिन्याच्या मुलीची विक्री करून बाईक, म्युझिक सिस्टीम आणि दिवाण खरेदी केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील व विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. उत्कर्ष दहिवले असे अटक करण्यात आलेल्या वडिलाचे नाव असून उषा सहारे असे मध्यस्थी करणाऱ्या महिला आरोपीचे नाव आहे. 


आरोपी उषा ही रामटेक मधील खाजगी अनाथआश्रमामध्ये काम करते. तर उत्कर्ष नळ फिटिंगचे काम करतो. उत्कर्षने 1 लाख रुपयात मुलीला विकण्याची बोलणी केली. या कृत्यास त्याच्या पत्नीचा विरोध होता. मात्र ही बाब कुणाला सांगितली तर उत्कर्षने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मुलीच्या आईचा नाईलाज झाला. अखेर 15 एप्रिलला मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत पतीने आपल्या दोन महिन्याच्या मुलीची विक्री केल्याचे सांगितले. याप्रकरणी उषा नावाच्या महिलेने मध्यस्थी केल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. 


मुलीची विक्री केल्यानंतर उत्कर्षला सत्तर हजार रुपये मिळाले होते तर उषा नावाच्या मध्यस्थी करणाऱ्या आरोपी महिला 30 हजार रुपये मिळाले होते. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करत दोघांना अटक केल्यानंतर आरोपी बापानं मुलीची विक्री करून दुचाकी, म्युझिक सिस्टीम आणि दिवाण अशा ऐशोआरामच्या वस्तू खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींचा समावेश आहे का याचा शोध पोलीस घेत आहे.


पाचपावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितलं की, आरोपीनं एक लाख रुपयात मुलीला विकलं. त्यातील 70 हजार रुपये स्वत:ला ठेवले तर 30 हजार रुपये मध्यस्थी करणाऱ्या महिलेला दिले. त्यानं 70 हजार रुपयात एक गाडी, म्युझिक सिस्टीम अशा गोष्टी खरेदी केल्या. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे, असं मेंढे यांनी सांगितलं.


एका खाजगी अनाथाश्रमात काम करणाऱ्या महिलेने या प्रकरणात मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत एक लाखात चिमुकलीची विक्री एका निपुत्रिक दाम्पत्याला केली होती. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून निपुत्रिक दांपत्याला दिले होते. पीडित मुलीच्या आईने या प्रकाराची पोलिसांकडे दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडील तसेच मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. मुल विक्रीचा गेल्या दीड महिन्यातला नागपुरातला दुसरा प्रकार आहे. मुल विक्रीची आणखी काही धक्कादायक प्रकरणं पोलिसांच्या तपासात समोर आली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीय.



इतर महत्वाच्या बातम्या


Daund Crime : भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग, 23 जणांच्या टोळक्याचा पोलिसासह मित्रांवर जीवघेणा हल्ला



Crime News : दिल्लीत भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, भररस्त्यात 6 गोळ्या झाडल्या, सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू