Crime News : देशाची राजधानी दिल्लीत गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गुन्हेगार अगदी बिनधास्त झाले असून जहांगीरपुरीमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबारावरून याचा अंदाज लावता येतो. दरम्यान गाझीपूर पोलिस स्टेशन परिसरात दिल्लीतील भाजप नेत्यावर गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आलीय.


भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या


गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरात भाजप नेते जितू चौधरी यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितू चौधरी यांच्यावर हल्लेखोरांनी 6 गोळ्या झाडल्या आहेत. जितू चौधरी हे भाजपचे मयूर विहार जिल्ह्याचे मंत्री होते. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, जितू चौधरी यांचा बांधकाम व्यवसाय होता. त्यांचा एका ठेकेदारासोबत पैशांवरून वाद सुरू होता. हत्येमागे व्यवहाराचा वाद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात, 42 वर्षीय जितू चौधरी यांच्यावर बुधवारी रात्री 8.15 च्या सुमारास अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. उपचारासाठी रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


रक्ताच्या थारोळ्यात सापडले


या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8.15 च्या सुमारास गाझीपूर पोलिस स्टेशनच्या बीट कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान मयूर विहार परिसरात गर्दी दिसली. ज्यामध्ये 42 वर्षीय जितेंद्र उर्फ ​​जीतू चौधरी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.


रिकामी काडतुसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त


जितू चौधरीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर लोकांनी त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात नेले. त्याचवेळी रुग्णालयात डॉक्टरांनी जितू चौधरीला मृत घोषित केले. सध्या त्यांच्या गुन्हे पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनास्थळावरून काही रिकामी काडतुसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजचा शोध सुरू आहे.