Nagpur Crime : गुजरातच्या बहुचर्चित गोधरा जळीतकांड (Godhra Train Burning) प्रकरणातील काही आरोपी आता चक्क दरोडेखोर झाले आहेत. देशभरात वेगवेगळ्या राज्यात दरोडे घालण्यासाठी एक खास गॅंग बनवली असून त्याचे नाव ताडपत्री गॅंग (Tadpatri Gang) असे ठेवले आहे. नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) एका कारवाईमुळे या गँगचा पर्दाफाश झाला.


23 जून रोजी काही दरोडेखोरांनी फ्लिपकार्टचे गोदाम लुटला. हा लुटलेला माल कंटेनरमधून घेऊन जात असताना नागपूर ग्रामीण परिसरातील उमरेड इथे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अडवला. तेव्हा त्यांनी पोलिसांना रॉडने मारहाण करुन तिथून पळ काढला. तेव्हापासून नागपूर ग्रामीण पोलीस या आरोपींच्या मागावर होते. त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे आणि हे दोघेही गोधराचे असून, मुख्य आरोपी उस्मानगणी मोहम्मद कॉफीवाला हा जळीतकांडातील आरोपी असल्याचे समोर आले. 


* मुख्य आरोपी उस्मान गणी मोहम्मद 55 वर्षाचा आहे. तर त्याचा साथीदार जाफरु बांडी हा 40 वर्षाचा आहे.


* उस्मान गणी मोहम्मद हा 2002 च्या गुजरात येथील गोधरा हत्याकांडाचा आरोपी आहे


* गोधरा कांड प्रकरणात तो 8 वर्ष कारागृहाची हवा खाऊन आलेला आहे


* आरोपीने कारागृहातून बाहेर आल्यावर ताडपत्री नावाने एक टोळी बनवली जी वेगवेगळ्या राज्यांमध्ये दरोडा टाकण्यासाठी कुप्रसिद्ध प्रसिद्ध आहे


* उस्मान गणी मोहम्मदवर दंगल घडवणे, हत्या, हत्येचा प्रयत्न, शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला, जनावरांची तस्करी, घरफोडी, दरोडे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.


गोधरा जळीतकांड झाले तेव्हा रेल्वे स्टेशनवर कॉफी विकायचो, असे या मुख्य आरोपीचे म्हणणे आहे. आठ वर्ष जेलमध्ये राहिल्यावर त्याने जी ताडपत्री गँग बनवली ती चक्क कंटेनर घेऊनच दरोडा टाकायला निघायची. राज्यांच्या सीमेचे कुठलेही बंधन नव्हते. विशेष म्हणजे उभे मालवाहू ट्रकच्या ताडपत्री कापून संपूर्ण माल लुटून नेणे अशा प्रकारचे गुन्हे ही ताडपत्री गँग करत होती असं कळते. 


दरम्यान इतर आरोपी हे अजून हाती यायचे आहेत. त्यामुळे नक्की गोधरा जळीतकांडातील आणखी किती आरोपी यात सामील आहेत हे तपास पूर्ण झाल्यावरच कळेल.