नागपूर : गांजा आणि शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाने पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नागपुरातील मोमिनपुरा या ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली होती. मात्र त्याच दिवशी पोलिस निरीक्षकाने एका आरोपीला फरार होण्यात मदत केली. त्याच्यावर फरार झाल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप जनता फाउंडेशनच्या जिशान सिद्दीकी यांनी केला.
मद्यप्राशन केलेले तीन तरुण नागपूरच्या मोमिनपुरा येथून रात्रीच्या सुमारास कारमधून भरधाव जात होते. तहसील पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीतील तरुणांनी बेधडकपणे वाहन पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या वाहनाला धडक देत ते पसार झाले. ही घटना 16 नोव्हेंबरच्या रात्री घडली.
एका आरोपीला पोलिसांनीच फरार केल्याचा आरोप
या प्रकारानंतर कारमधील तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली. सोहेल खान, संकेत कन्हेरे आणि राहुल राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी मेयो हॉस्पिटलला नेण्यात आलं. मात्र, त्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांनी सोहेल खान याला सोडून देत तो घटनास्थळावरून फरार झाल्याचं दाखवलं.
मेयो हॉस्पिटलला मेडिकलला नेण्यात आलं आणि तिथून आरोपी सोहेल खान हा फरार होत असल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं. यात पोलिस निरीक्षक बुवा यांनी मोठी आर्थिक उलाढाल केल्याचा गंभीर आरोप जनता फाउंडेशनच्या जिशान सिद्दीकी यांनी केला आहे. अनेक गंभीर गुन्हे असलेला सोहेल खान हा एमडी तस्करीही करत असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, आरोपींच्या कारमध्ये गांजा आणि शस्त्रसाठा असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. तर फरार दाखविण्यात आलेल्या सोहेल खानला 15 ते 20 दिवसानंतर अटक दाखवण्यात आली. मात्र, त्याच्यावर फरार झाल्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळं या गंभीर प्रकरणी पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिशान सिद्दीकी यांनी केली आहे.
ही बातमी वाचा: