Lakhimpur Violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणाला नवे वळण लागले आहे. लखीमपूर खेरी येथील घटना हा सुनियोजित कट होता, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एसआयटीने आता आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमांमध्येही बदल केला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर आता निर्दोष हत्येऐवजी हत्येचा खटला चालणार आहे. आज आरोपींनाही न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.


सुनियोजित कट असल्याचा आरोप
लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्रासह 14 जणांवरील चौकशीनंतर कलमांमध्ये बदल करण्यात आला आहेत. सर्व आरोपींवर जाणीवपूर्वक नियोजन करुन गुन्हा केल्याचा आरोप आहे. SIT ने भांदवि (IPC) कलम 279, 338, 304A काढून 307, 326, 302, 34,120 B, 147, 148,149, 3/25/30 या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


काय आहे प्रकरण?


यावर्षी 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खेरी येथील टिकुनिया येथे एका कार्यक्रमात कृषी कायद्यांचा निषेध करुन परतत असताना चार शेतकऱ्यांना कारने चिरडले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी उपस्थित होते. या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात काही लोकांचा मृत्यूही झाला होता. या घटनेत स्थानिक पत्रकार रमन कश्यप यांचाही मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी अजय मिश्रा टेनी यांची असून त्यात त्यांचा मुलगा आशिष मिश्रा असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पहिली सुनावणी 8 ऑक्टोबर रोजी झाली. त्यानंतर आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू याला अनेक तासांच्या चौकशीनंतर 9 ऑक्टोबरला अटक करण्यात आली.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha