Nagpur News : तृतीयपंथींच्या जबरीने वसुलीला नागरिक त्रासले होते. याची दखल घेऊन पोलीस (Nagpur Police) आयुक्त अमितेश कुमार यांनी कलम 144 अंतर्गत तृतीयपंथींची लगाम कसली होती. नागरिकांकडून बळजबरीने वसुली केली तर भविष्यात कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट आणि कठोर इशाराही त्यांच्या संघटनांना बैठक घेऊन देण्यात आला होता. मात्र काही दिवस शांत बसल्यानंतर तृतीयपंथी पुन्हा सक्रिय झाले. लग्नघरी जाऊन बळजबरीने वसुली करू लागले.
चौका-चौकातही वाहन चालकांकडून वसुली सुरू झाली. त्यामुळे आता नाईलाजाने पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागली. बळजबरीने वसुली करणाऱ्या 11 तृतीयपंथींवर सीताबर्डी आणि गिट्टीखदान ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवून 3 तृतीयपंथीना अटकही केली. या कारवाईने तृतीयपंथींचे धाबे दणाणले आहेत. तर नागरिकांनी ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली आहे.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला इंस्टाग्रामवर तृतीयपंथींचा व्हिडीओ दिसला. त्यात अलंकार टॉकीज चौकात काही तृतीयपंथी नागरिकांकडून जबरीने वसुली करीत होते. व्हिडीओवरून तपास केला असता सिग्नलवर वसुली करणारे ते तृतीयपंथी भांडेवाडीच्या अंबेनगरात राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आकांक्षा तुकाराम बनसोड (19), मुस्कान सुनील शेख (26) आणि श्वेता शामराव पखाले (31) ला अटक केली. तर त्यांचे साथीदार वैशाली पाटील (24) आणि अम्मू भगत (26) सध्या फरार आहेत. सर्व आरोपींवर सीताबर्डी ठाण्यात जबरीने वसुलीचा गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई डीसीपी सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनात पोनि शुभांगी वानखेडे आणि त्यांच्या पथकाने केली.
11 हजार रुपयांची केली मागणी
दुसरी कारवाई गिट्टीखदान ठाण्यांतर्गत करण्यात आली. परिसरात लग्न समारंभ होत असल्याची माहिती मिळताच काही तृतीयपंथी तेथे पोहोचले. लग्न घरच्या मंडळींनी 1000 रुपये दिले असता 11 हजार रुपयांची मागणी करू लागले. या प्रकरणी पोलिसांनी शशांक प्रदीप गट्टेवार रा. बेसा, पिपळा रोडच्या तक्रारीवरून 5 तृतीयपंथींवर गुन्हा नोंदविला आहे. सोनू गौरे, छोटी गजभिये, जान्हवी स्टीफन पीटर, डिंपल जॉन गजभिये आणि परी गजभिये सर्व रा. झिंगाबाई टाकळी अशी आरोपींची नावे आहेत.
स्वखुशी दिलेले हजार रुपये नाकारले
गिट्टीखदानच्या नर्मदा कॉलनीत तक्रारदाराचे नातेवाईक प्रशांत पाटील राहतात. त्यांच्याकडे लग्न होते. सायंकाळी तक्रारदार लग्न समारंभात सामील होण्यासाठी पाटील कुटुंबाच्या घरी आले होते. दरम्यान वरील तृतीयपंथी तेथे आले आणि पैशांची मागणी केली. पाटील कुटुंबाने पैसे देण्यास नकार दिला असता गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे तक्रारदाराने त्यांना 1000 रुपये दिले. मात्र आरोपींनी 11 हजार रुपयांची मागणी लावून धरली. यावेळी तक्रारदाराने नकार दिला असता राडा घालून निघून गेले. घटनेची तक्रार गिट्टीखदान पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी खंडणी आणि मनाई आदेशाचे उल्लंघनासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. आरोपींचा शोध सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :