मुंबई : भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण करणाऱ्या एका टोळीला कांजूर मार्ग पोलिसांनी गजाआड केला आहे. फुटपाथवर राहणाऱ्या वर्षा कांबळे हिच्या दोन मुलांचं अपहरण करण्यात आलं होतं. या दोन मुलांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 11 दिवस आरोपींचा पाठलाग केला आणि अखेर त्यांची सुटका करून दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून एक महिला आरोपी फरार आहे.


कांजूर मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांजूर रेल्वे स्थानक फुटपाथवर राहणाऱ्या वर्षा कांबळे हिचा पाच वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी या दोघांचं अपहरण करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी पुण्याहून मुंबईकडे येताना ट्रेनमध्ये वर्षाची काळे कुटुंबीयांशी ओळख झाली होती आणि त्यांनीच आपल्या मुलांचं अपहरण केलं असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं होतं. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर काळे कुटुंबीयांचा ठाणे, कोल्हापूर, सांगली, नगर, औरंगाबाद या शहरात शोध घेऊन पाठलाग केला आणि  यांच्यातील मुख्य आरोपी हर्षद काळे याच्यासोबत ताराबाई काळे चंदू काळे तसेच आणखी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.


हर्षद काळे याची बायको पौर्णिमा काळे ही सध्या फरार आहे. वर्षा हिच्या दोन मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत या दोन मुलांचं अपहरण भीक मागण्यासाठी केलं असल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलं आहे. परंतु त्यानंतर पुढे या मुलांचं हे लोक काय करायचे आणि आतापर्यंत अशा किती मुलांचं त्यांनी अपहरण केलं आहे याचा तपास सध्या कांजूर मार्ग पोलीस करत आहेत. 


कांजूर मार्ग पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी पुरषोत्तम कराड यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितलं की, कांजूर मार्ग रेल्वे स्थानकाच्या बाहेरुन या दोन मुलांचं अपहरण करण्यात आलं. आरोपींनी तीन ते चार दिवस या मुलांवर नजर ठेवली होती आणि त्यानंतर अपहरण केलं. यानंतर पोलिसांनी याच्या तपासासाठी पाच टीम तयार केल्या. त्यानंतर ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी या टीम पाठवल्या. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक महिला आरोपी फरार आहे. केवळ भीक मागण्यासाठी या मुलांचं अपहरण करण्यात आलं होतं की अजून काही उद्देश या मागे होता याबद्दल तपास सुरू आहे. 


अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवर चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.