मुंबई :  मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट सातने एक आंतराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी शैक्षणिक फंड मिळवून देण्याचा नावाखाली  लाखोंची फसवणूक करत होते. प्रसाद भोलापती आणि विनेश विश्वनाथ अशी या आरोपींची नावे आहेत.  या टोळीने आता पर्यंत  नऊ जणांना साडे चार कोटींचा गंडा घातला असून हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. 


पाच दिवसांपूर्वी एक महिलेला या दोन्ही आरोपींनी एक पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथे त्यांनी आपण अधिकारी असलेल्या कंपनीला आयपीएमआय कंपनीकडून 80 हजार कोटी रुपयांचा शैक्षणिक फंड मिळाला असल्याचे सांगितले. हा फंड रिझर्व्ह बँकेत आहे आणि तेथील अधिकाऱ्यांना पन्नास लाख रुपये दिल्यास त्यांना सात कोटी रुपये मिळतील असे त्यांना अमिश दाखविले.


या बाबत त्याने भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय अर्थ मंत्रालय, भारतीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारतीय कॉर्पोरेट मंत्रालय, परदेशी बँक आणि तेथील कंपन्यांची बनावट कागदपत्रे दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला भुलून फिर्यादी महिलेने त्यांना तात्काळ 50 हजार रुपये अॅडव्हान्स देखील त्यांना दिले. पुढील रक्कम घेण्यासाठी त्यांनी दुसऱ्या दिवशी घाटकोपरला त्या महिलेला बोलावले. मात्र या दरम्यान फिर्यादी महिलेच्या एक मित्राने सदर टोळी लोकांची अशी फसवणूक करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर या महिलेने गुन्हे कक्ष सातशी संपर्क साधला आणि झालेली हकीकत पोलिसांना सांगितली.


पोलिसांनी हे दोन्ही आरोपी जिथे महिलेला भेटणार होते. त्या घाटकोपरमधील हॉटेलवर छापा टाकला आणि या दोघांना अटक केली आहे. त्यांचाकडून अनेक शासकीय कागदपत्रे, बँकेची कागदपत्रे , सरकारी, मंत्रालयाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली असून ती सर्व बनावट आहेत. या टोळीने, दिल्ली, महाराष्ट्रसह विविध राज्यात असेच लोकांना फसविल्याचे समोर आले आहे. या टोळीत काही परदेशी सदस्य असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली असून पुढील चौकशी गुन्हे कक्ष सात करत आहे.