मुंबई : क्राईम ब्रान्चचे ऑफिसर भासवून एका खाजगी कंपनीतील आयटी मॅनेजरचं अपहरण करुन त्याच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. याशिवाय त्यांच्याकडून चारचाकी आणि अधिकृत कागदपत्रे जप्त केली आहेत. या दोघांनी आयटी कंपनीच्या मॅनेजरला क्राईम ब्रान्चचे अधिकारी म्हणून फोन करुन आधी कारमध्ये बोलावलं. नंतर जबरदस्तीने एटीएममधून दोन हजार रुपये काढले .
गोरेगाव ईस्ट इन्फिनिटी आयटी पार्क इथे कार्यरत असलेल्या व्यवस्थापक रवी छोटेलाल जैस्वार (वय 20 वर्षे) याच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांना दोघांना अटक करण्यात आली. 11 जून रोजी कामावरुन घरी जात असताना आरोपी हरीश शाडप्पा गायकवाड (वय 27 वर्षे) आणि चंद्रकांत शदाप्पा गायकवाड (वय 32 वर्षे) यांनी रवी जैस्वारला वाटेत अडवलं. गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून त्याची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्याला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवलं आणि त्याला मारहाण केली.
"तू आयटी कंपनीत किती फसवणूक करतोस ते सांग. नाही सांगितलं तर तुझ्या मित्रांना उचलू, जगायचं असेल तर लगेच दहा हजार रुपये दे नाहीतर सोडणार नाही," असं दोन्ही आरोपी भावांनी रवीला म्हटलं. त्यानंतर अंधेरीच्या दिशेने कार घेऊन दोघांनी रवीच्या एटीएममधून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढले आणि रवीचे एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आयकार्डही ताब्यात घेतलं.
आज सोडतोय पण पैसे दिले नाहीत तर पुन्हा उचलणार, अशी धमकीही या दोघांनी रवीला दिली. दोघांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर मॅनेजर रवीने दिंडोशी पोलीस ठाणे गाठलं आणि अपहरण तसंच खंडणीची तक्रार नोंदवली.
दिंडोशी पोलीस ठाण्याच्या पथकाने कारच्या नंबर प्लेटवरुन माहिती काढून दोन्ही आरोपी भावांना मालाडच्या जनकल्याणनगर इथून अटक केली. दोन्ही भाऊ हे भाजी आणि फळांचे विक्रेते असल्याचं तपासात निष्पन्न झालं. हे दोघे बराच वेळ मॅनेजर रवी जैस्वारला क्राईम ब्रान्चचे अधिकारी म्हणून धमकावत होते. याआधीही त्यांनी बऱ्याच जणांना क्राईम ब्रान्चचे अधिकारी असल्याचं सांगून हफ्ते वसूल केले आहेत, दिंडोशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षत चंद्रकांत घारगे यांनी ही माहिती दिली.