Mumbai Crime : प्रेयसीच्या इच्छा पुरवण्यासाठी, पत्नीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, घरातील आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे काही जण चोरीचा मार्ग स्वीकारतात. असाच प्रकार मुंबईजवळच्या मीरा रोड (Mira Road) इथे समोर आला आहे. बॉडी बिल्डर (Body Builder) बनवण्यासाठी एका तरुणाने चक्क दुचाकी चोरीचा मार्ग निवडला. व्यायाम करुन सुदृढ शरीर बनवण्यासाठी पूरक आहार आणि औषधे मिळावीत यासाठी मीरा रोड इथल्या तरुणाने चक्क दुचाकी चोरीचा (Bike Theft) मार्ग निवडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विघ्नेश मिश्रा (वय 23 वर्षे) असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. त्याच्याकडून 4 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या दहा चोरलेल्या दुचाकी सापडल्या. 


एका दुचाकी चोरीच्या तपासातून दहा दुचाकी चोरीची घटना उघड


काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 21 जानेवारी रोजी एक दुचाकी चोरीला गेली होती. त्याचा तपास करताना, पोलिसांना विघ्नेश मिश्रा हा २३ वर्षाचा युवक सापडला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून 4,20,000 रुपये किंमतीच्या चोरीच्या दहा मोटारसायकल सापडल्या. पोलिसांनी चौकशीदरम्यान त्याला दुचाकी चोरण्यामागचं कारण विचारलं. कारण ऐकून पोलीसही चक्रावलेल.


बॉडी बिल्डर बनण्यासाठी दुचाकी चोरीचा मार्ग


आरोपी विघ्नेश मिश्राला बॉडी बिल्डर बनण्याची हौस होती. वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करत असतात. आपलं शरीर सुदृढ बनवण्यासाठी त्याला पूरक आहार आणि औषधे विकत घेण्यासाठी त्याला घरातून गरजेएवढे पैसे  मिळत नव्हती. त्यामुळे आरोपी विघ्नेश मिश्राने बॉडी बिल्डर बनण्यासाठी चक्क बाईक चोरी करण्याचा मार्ग निवडला. 


बायकोच्या घराच्या स्वप्नासाठी 'तो' चोर बनला!


पुण्यातील कोंढवा भागातून महिनाभरापूर्वी अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. पत्नीसाठी नवीन घर घेता यावं म्हणून पतीने तब्बल 37 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली होती. दागिने चोरणाऱ्या चोर पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मलाप्पा होसमानी (वय 31 वर्षे)  असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचने या आरोपीला अटक केली. कोंढव्यात राहणाऱ्या बबिता डिसूजा यांच्या घरात ख्रिसमसच्या दिवशी चोरी झाली होती. या चोरीची तक्रार कोंढवा पोलिसांकडे दिली होती. ख्रिसमस असल्याने डिसूजा कुटुंबीय रात्री बाहेर गेले असताना आरोपीने घराच्या पाठीमागून येऊन खिडकीला लावलेले ग्रील तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्याने घरातील सोने, चांदीच्या दागिन्यांबरोबर डायमंड, नेकलेस आणि महागडी घड्याळ देखील लंपास केली. डिसूजा कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच डिसूजा कुटुंबीयांनी थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.