Mumbai Crime News :  शेजारी घर विकत नसल्याने एकाने थेट मुंबई पोलिसांना (Mumbai Police) फोन कॉल केला. मात्र, या व्यक्तीने आपल्या सोसायटीमध्ये (Housing Society) दहशतवादी घुसला असल्याचे सांगितले. या फोन कॉलनंतर पोलिसांमध्ये खळबळ उडाली. मात्र, खरं कारण समोर आल्यानंतर पोलिसांवर कपाळावर हात मारण्याशिवाय पर्याय उरला नाही. पोलिसांनी फोन कॉल करणाऱ्याला अटक केली आहे. 


मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई (Gorai) येथील एका सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. सोसायटीत अतिरेकी घुसले असल्याचा फोन मुंबई पोलिसांना केला. या फोननंतर मुंबई पोलिसांची एकच धावपळ उडाली होती. पोलिसांनी सोसायटी जाऊन चौकशी केल्यानंतर सत्य परिस्थिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध घेत अटक केली आहे. हा आरोपी सोसायटीचा उपाध्यक्ष असल्याचे समोर आले. 


शेजारचे घर विकत घेण्यासाठी पोलिसांना कॉल


भूषण नारायण पालकर (58 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दारूच्या नशेत हा फेक कॉल केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हा सोसायटीचा उपाध्यक्ष असून त्याला त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा फ्लॅट विकत हवा होता. मात्र, तो विकत नव्हता. त्यामुळे खोली रिकामी करण्यासाठी त्याने हा फोन कॉल केला असल्याचे आरोपीने चौकशीत कबूल केले आहे. बोरिवली पोलिसांनी आरोपीला मोबाईलसह ताब्यात घेतले असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.



दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही; पतीने पत्नीला संपवले 


दारूच्या व्यवसनात अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होते. आर्थिक चणचणीपासून ते कुटुंबाची ससेहोलपट दारूमुळे होते. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणाने एकाने आपल्या पत्नीला संपवले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला (Police Arrested Accused ) अटक केली आहे. मुंबईतील (Mumbai) मालाड (Malad) परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


गुरुवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत राहणाऱ्या एका व्यक्तीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बोरिवली जीआरपीने हत्येअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यावर तातडीने तपास सुरू केला. त्यानंतर अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.