Mumbai Crime News : तब्बल पाच वेळा महिला आणि लहान मुलींवर छेडछाड, अत्याचार करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका सात वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याच्यार करण्याचा गुन्ह्यात घाटकोपर पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी घाटकोपर पोलीस पुढील तपास करत आहेत. 


सात वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव सचिन अनंत शामा असून तो 35 वर्षांचा आहे. घाटकोपरच्या आनंद नगर विभागात पीडित सात वर्षीय मुलगी वडापावच्या दुकानात आली होती. तिला या आरोपीनं गोड गोड बोलून तिथून दूर निर्मनुष्य ठिकाणी नेलं. वडापावच्या दुकानापासून तब्बल एक ते दीड किलोमीटर दाट झाडी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नराधम मुलीला घेऊन गेला. तिथं त्यानं चिमुरडीवर अत्याचार केले. त्यानंतर तिथून पळ काढला. तिथून जाणाऱ्या नागरिकांनी मुलीला पाहिलं आणि पोलीसांना, तिच्या नातेवाईकांना कळवलं. 


पोलिसांनी तात्काळ मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा नोंदविला आहे. तसेच, प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार करून विभागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासलं आहे. यात पोलिसांना आरोपीचे चित्र मिळालं असून यातील सचिन शामा हा घाटकोपर, साकीनाका, पार्कसाईट पोलीस ठाण्यात पाच अशाच प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. आरोपी अशाच गुन्ह्यांमध्ये कोठडीत असून कोविड काळात कोठडीतून बाहेर आल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी तात्काळ भिवंडी येथे सापळा रचून त्याला 24 तासांच्या आत अटक केली. याप्रकरणी घाटकोपर पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती परीमंडळ सातचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :