Kalyan: नवजात बाळाला रेल्वेत सोडून पळून जाणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी महिला डोंबिवलीत राहणारी असून तिनं 20 नोव्हेंबरला पोटच्या बाळाला टिटवाळा रेल्वे स्थानकात सोडून पळ काढला होता. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचनं सीसीटीव्हीच्या सहाय्यानं संबंधित महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केलीय. या महिलेनं अनैतिक संबंधातून बाळाला जन्म दिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 


मिळालेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी टिटवाळ्याहून ट्रेन निघाली असता एका पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. कल्याण जीआरपीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास कल्याण जीआरपीसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही तपास करीत होते. दरम्यान, सर्व स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. त्यावेळी एक महिला कोपर रेल्वे स्थानकातून रेल्वेत बसली असून तिच्या हातात पिशवी असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलं. तसेच ज्या पिशवीत बाळ सापडलं. ती पिशवी आणि या महिलेच्या हातातील पिशवी एकसारखीच दिसत असल्यानं पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. 


कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचचे पोलिस अधिकारी अशरद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचं एका विवाहित पुरुषासोबत संबंध होते. त्या महिलेला त्यानं घर घेऊन दिलं होतं. त्यांच्या दोघातील अनैतिक संबंधामुळं तिनं बाळाला जन्म दिलाय. हे बाळ नकोसे झाल्यानं तिनं बाळाला रेल्वे ट्रेनमध्ये सोडलं होतं. यात तिचा प्रियकर ही सहभागी होता. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha