Mumbai Crime News: एक महिला आणि तिच्या चार अल्पवयीन मुलांची हत्या केल्याप्रकरणातील आरोपीला तब्बल 28 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. राजकुमार चौहान असे या आरोपीचे नाव असून त्याला गुरुवारी विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्यावेळी आरोपी राजकुमार हा कतारहून परतला होता. 


हत्या प्रकरण घडले तेव्हा आरोपी राजकुमार हा 19 वर्षांचा होता. त्याच्यासह एकूण तीन आरोपी आहेत. इतर आरोपी अनिल सरोज (घटनेच्या वेळी वय 25) आणि त्याचा भाऊ सुनील (घटनेच्या वेळी वय 21) हे अद्यापही फरार असल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.


प्रकरण काय?


या तिन्ही आरोपींनी त्यांच्या शेजारी राहणारी जागरानी देवी (27) या महिलेची हत्या केली. तिच्यासह पाच वर्ष, दोन वर्ष आणि तीन महिन्याच्या मुलांची हत्या त्यांनी केली. त्याशिवाय तीन वर्षीय मुलीचीदेखील आरोपींनी हत्या केली. सूड उगवण्यातून ही हत्या झाली असल्याचे म्हटले जाते. आरोपी तरुणांनी 16 नोव्हेंबर 1994 रोजी दुपारी 3.45 च्या सुमारास भरवाड चाळ, पेणकरपाडा, काशिमीरा येथील जागराणी देवीच्या घरात घुसून महिला आणि चार मुलांची चॉपर आणि चाकूने हत्या केली. जागरानी देवीचे पती राजनारायण चौहान हे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. 


राजनारायण चौहान यांनी आरोपी म्हणून सरोज बंधूंची नावे पोलिसांना सांगितली होती. या तिघांनी जागरानी देवीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राजनारायण चौहान आणि जागरानी देवीने या तिघांचा प्रतिकार केला. त्यावेळी आरोपींनी राजनारायण चौहान आणि जागरानी देवींना जाहीरपणे गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती. हत्येच्या घटनेनंतर आरोपी फरार होते. त्यांच्याविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. वर्ष 2006 मध्ये राजनारायण चौहान यांचा एका रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. 


अशी झाली कारवाई


पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले, मागील वर्षी हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले. काशिमिरा पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर युनिटच्या पथकाने जून 2021 मध्ये उत्तर प्रदेशमधील वाराणसीला भेट दिली होती. वाराणसी पोलिसांच्या एसआयटीसह  20 दिवस तपास केला. या दरम्यान पोलिसांना आरोपी0चौहान उर्फ काल्या उर्फ साहेबाविषयी माहिती मिळाली. तो 2020 पासून कतारमध्ये काम करत असल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी त्याच्या पासपोर्टची माहिती मिळवून त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी केली. 


कतारमधून पुन्हा भारतात परतत असलेल्या आरोपी चौहानला पोलिसांच्या कारवाईबाबत कोणतीच माहिती नव्हती. गुरुवारी तो मुंबई विमानतळावर इमिग्रेशनमधून जात असताना त्याला अटक करण्यात आली. आरोपी चौहान हा कतारमधील एका काच कंपनीत कामगार म्हणून काम करत होता. अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींच्या ठावठिकाणांबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.