Mumbai Crime News :  दारूच्या व्यवसनात अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होते. आर्थिक चणचणीपासून ते कुटुंबाची ससेहोलपट दारूमुळे होते. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणाने एकाने आपल्या पत्नीला संपवले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला (Police Arrested Accused ) अटक केली आहे. मुंबईतील (Mumbai) मालाड (Malad) परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


गुरुवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत राहणाऱ्या एका व्यक्तीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बोरिवली जीआरपीने हत्येअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यावर तातडीने तपास सुरू केला. त्यानंतर अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 


आरोपी मोईनुद्दीन अन्सारी याला मालवणी परिसरातून अटक केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी मुंबईतून पळून जाण्याचा कट आखत होता. मात्र तो पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. परवीन अन्सारी असे त्याच्या मृत पत्नीचे नाव आहे.


पोलिसांनी सांगितले की, मृत महिला ही महिला काबाडकष्ट करून पैसे कमवत असे आणि तिचा पती महिलेकडून पैसे घेऊन दारू प्यायचा, जेव्हा महिला पैसे देत नाही तेव्हा तो तिला मारहाण करायचा. गुरुवारी पतीने पत्नीकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, तिने त्याला नकार दिला. या नकाराने संतापलेल्या आरोपी मोईनुद्दीनने तिला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. मारहाण करतानाच आरोपीने पत्नीला संपवले. 


आरोपीला 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


मित्रांसाठी चकना घेऊन गेला तो परतलाच नाही; पूर्ववैमनस्यातून घेतला जीव


भिवंडी (Bhiwandi) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून या तरुणाची हत्या झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर, या युवकाची हत्या करून मृतदेह काल्हेर येथील खाडीकिनारी निर्जनस्थळी गाडण्यात आले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करत दोघांना ताब्यात घेतले असून, जुन्या वादातून त्यांनी ही हत्या केली असल्याचे समोर येत आहे. योगेश रवि शर्मा (वय 16 वर्ष) असे मयत अल्पवयीन तरुणाचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शर्मा हा काल्हेर येथील आशापुरा कॉम्प्लेक्स भागात राहत होता. दरम्यान, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्याच्या काही मित्रांनी त्याला काल्हेरच्या रेतीबंदर येथे दारू पिण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे चकन्यासाठी काहीतरी घेऊन ये असे देखील त्याला सांगितले. त्यानंतर योगेश घरातून गेला तो परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अनेक ठिकाणी शोध घेऊन देखील तो मिळून आला नाही. शेवटी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. योगेश अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.