Maharashtra Mumbai Crime : मुंबईत (Mumbai News) घडलेल्या धक्कादायक घटनेनं वृद्ध नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. एका बेघर, अंध ज्येष्ठ महिलेची एका 28 वर्षीय तरुणानं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली असून आरोपींनाही ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या प्रकरणी 28 वर्षीय तरुणासोबतच पोलिसांनी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. 


दक्षिण मुंबईतील (Mumbai Crime) महालक्ष्मी परिसरात एका अंध ज्येष्ठ नागरिकाचा खून करण्यात आला. शारदा वाघमारे असं 65 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्याला मार लागल्यानं या अंध महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सर्वात आधी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र, सखोल चौकशी केली असता दरोडा आणि खुनाचा प्रकार असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर घडला प्रकार समोर आला. 


12 नोव्हेंबर रोजी पहाटे ही घटना घडली. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाखाली ही बेघर, अंध ज्येष्ठ महिला तिच्या नेहमीच्या जागेवर झोपली होती. अटक करण्यात आलेला आरोपी शुभम चौबे उर्फ ​​पंडित हा मजुरी करतो. तो पूर्वी धोबीघाटच्या आसपासच्या परिसरात राहत होता. त्यामुळे त्याला या संपूर्ण परिसराची चांगलीच माहिती होती. तो त्या परिसरात रात्री फिरत होता. तेवढ्या झोपलेली बेघर ज्येष्ठ महिला त्याला दिसली. तिच्याकडच्या बॅगेवर त्याची नजर पडली. महिलेच्या बॅगेत पैसे असल्याचा अंदाज लावत दोन्ही आरोपींनी तिची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. 


सर्वात आधी आरोपींनी बॅग ओढल्यावर महिला झोपेतून जागी झाली. तिनं दोघांना प्रतिकार केला. त्यावेळी दोघांनी तिथून पळ काढला. मात्र काही वेळानं दोघंही पुन्हा महिला झोपली असलेल्या ठिकाणी आले आणि तिची बॅग पळवून नेण्याचा प्रयत्न करु लागले. महिलेनं दोघांनाही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींशी झालेल्या झटापटीत दृष्टीहीन महिला तब्बल तीन फुटांवरुन खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 


दरम्यान, पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला. याप्रकरणी पोलिसांनी एका 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तर याला साथ देणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. त्याला डोंगरी येथील बाल सुधारगृहात पाठवले जाईल.