Mumbai Kalyan Dombivali News: एका दिवसात मुख्यमंत्र्यांकडून 40 एकूण 417 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळं कल्याण डोंबिवली भागातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रात रस्ते विकासकामांना आम्ही प्राधान्य दिलं आहे, कारण चांगल्या रस्त्यांमुळेच शहरांचा विकास होतो. त्याअंतर्गत नागरिकांना चांगले रस्ते देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेला एमटीएचएल प्रकल्प हा आधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारण्यात येत, त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण होणार असून तो गेम चेंजर ठरणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
'एक चेहरे में कई चेहरे लगा लेते हैं लोग'
स्वतःचा स्वार्थ जागृत झाला तर दुसरं काही दिसत नसतं असं बोलत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी काही लोकांचा एक चेहरा असतो. त्यामध्ये अनेक चेहरे असतात, पहिल्यांदाच भेटल्यावर चेहरा चांगला वाटतो, असं बोलताना शिंदे यांनी 'एक चेहरे में कई चेहरे लगा लेते हैं लोग' हे गाण्याचे बोल बोलत ठाकरे यांच्यावर नाव न घेता टोला लगावला .
शिंदे म्हणाले की, आम्ही गेम चेजर प्रकल्प राज्यात आणले आहेत. आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही. आम्ही 50 खोके घेतले नसून आणि 200 खोके देतो. 1 हजार खोके विकासासाठी दिले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, रस्ते या शहराच्या रक्तवाहिन्या आहे. त्यांचा विकास योग्य प्रकारे झाल्यास उद्योग व्यापाराला चालना मिळते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युती सरकारच्या काळात उड्डाणपूल तयार केले. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तयार केले. त्यावेळी याची गरज का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आत्ता तेच पूल आणि मार्ग कमी पडत आहे. राज्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारे आमचे सरकार असून रस्ते वाहतूकीची सक्षम जाळे राज्यात विणले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
आज 445 कोटी च्या रस्त्यांचे भुमिपूजन करून कल्याण डोंबिवली शहराच्या विकासाची ही एक नवी सुरुवात झाली आहे. ऐरोली काटाई नाका प्रकल्पाच्या पहील्या टप्प्याचे काम पूर्ण करून लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, ज्यामुळे अगदी कमी वेळात नागरिकांना नवी मुंबईत पोहोचता येईल" असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.