मुंबई: दादर रेल्वेस्थानकात एका सुटकेसमध्ये सोमवारी रात्री एक मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी जय चावडा आणि शिवजित सिंग या दोघांना अटक केली होती. ज्याची हत्या झाली तो अर्शद अली सादिक अली शेख आणि त्याची हत्या करणारे जय चावडा व शिवजित सिंग हे तिघेही मूकबधीर आहेत. त्यामुळे दादरमधील या हत्याप्रकरणाविषयीची (Dadar Murder Case) उत्सुकता वाढली होती. जय आणि शिवजित हे दोघेही मूकबधीर असल्याने पोलिसांना त्यांची भाषा जाणणाऱ्या तज्ज्ञांची मदत घेऊन दोघांची चौकशी करावी लागत आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
अर्शद शेख याची हत्या पैशांच्या वादातून झाली, असे सुरुवातीला जय चावडा आणि शिवजित सिंग यांनी दिलेल्या जबानीवरुन वाटत होते. मात्र, त्यांचे म्हणणे पोलिसांना पटत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आणखी कसून चौकशी केल्यानंतर या हत्याप्रकरणातील अनैतिक संबंधाचा अँगल समोर आला आहे. सांताक्रुझ येथील कलिना परिसरात राहणारा अर्शद शेख विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याची पत्नीही मूकबधिर आहे. अर्शदची पत्नी रुक्साना हिचे जय चावडा याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. त्यामुळेच जय चावडा आणि रुक्साना यांनी पूर्वनियोजित कट रचून अर्शद शेखची हत्या केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी रुक्सानाला ताब्यात घेऊन तिचीही चौकशी सुरु केली आहे.
अर्शद शेख लहानसहान कामं करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने त्याची पायधुनी येथे राहणाऱ्या जय चावडा आणि शिवजित सिंग यांच्याशी ओळख झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून हे सगळे एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान जय चावडा आणि अर्शदची पत्नी रुक्साना यांचीही ओळख झाली. या दोघांमध्ये प्रेमसंबंध फुलले आणि रुक्सानाने जय चावडा याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जय चावडा आणि शिवजित सिंग हे दोघेही सुरुवातील हत्येचा आळ एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तपासादरम्यान पोलिसांनी रुक्सानाचा मोबाईल तपासला. तेव्हा तिने रविवारी तिच्या मोबाईलवरील WhatsApp हिस्टरी डिलिट केली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
जय चावडाचा डबल गेम, हत्येचा आळ एकट्या शिवजित सिंगच्या माथी मारण्याचा प्रयत्न?
जय चावडा हा अर्शदचा मृतदेह असलेली सुटकेस घेऊन दादर स्थानकात तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात होता, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले होते. यानंतर पोलिसांनी शिवजित सिंगला उल्हासनगरमध्ये जाऊन ताब्यात घेतले होते. सुरुवातीला जय चावडा याने हत्येचा आळ एकट्या शिवजित सिंग याच्या एकट्याच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न केला. मी दारु आणण्यासाठी घराबाहेर गेलो असताना अर्शद आणि शिवजित यांच्यात हाणामारी झाली आणि शिवजितने त्याचा खून केला. नंतर त्यानेच मला धमकावून अर्शदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितली. मी शिवजितने अर्शदला ठार मारतानाचा व्हीडिओही शुट केला आहे, असे सांगत जय चावडा याने आपण निष्पाप आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केल्यानंतर जय आणि रुक्साना यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली होती.
आणखी वाचा