मुंबई: मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री मृतदेह असलेली एक सुटकेस मिळाली होती. ही सुटकेस घेऊन तुतारी एक्स्प्रेसने मुंबईबाहेर निघण्याच्या तयारीत असलेल्या प्रवीण चावडा आणि त्याचा साथीदार शिवजित सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. हे दोघेही मूकबधीर असल्याने पोलिसांना ही भाषा जाणणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन चौकशी करावी लागत आहे. प्राथमिक चौकशीनंतर या हत्याप्रकरणातील (Dadar Suitcase Murder) अनेक धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. हत्या झालेला  अर्शद अली सादिक अली शेख आणि आरोपी प्रवीण चावडा, शिवजित सिंग हे तिघेही मूकबधीर होते. सुरुवातीला सरळसोट हत्येचा प्रकार वाटणारे हे गुन्ह्याचे प्रकरण (Mumbai Crime news) प्रचंड गुंतागुंतीचे असल्याचे आता दिसत आहे.


मयत अर्शद अली सादीक शेख, जय चावडा आणि शिवजीत सिंह हे तिघेही मूकबधिर एकमेकांचे मित्र होते. रविवारी संध्याकाळी दारु प्यायला बसले असताना शिवजीत सिंह आणि अर्शद अली सादीक शेखचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्शद अली सादीक शेखचा खून केला. त्यानंतर जय आणि शिवजित सिंह यांनी सादिकचा मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून सुटकेसमध्ये भरला. हा मृतदेह  दोघांनी मिळून टॅक्सीत टाकला. त्यानंतर जय चावडा पायधुनीवरून बॅग घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात आला. तिथून खोपोली लोकल पकडून तो दादरला उतरला. यानंतर जय चावडा ही बॅग घेऊन तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढत होता. त्यावेळी पोलिसांनी संशय आला आणि त्यांनी त्याला हटकले असता त्याने बॅग उघडल्यानंतर हा सगळा  प्रकार उघडकीस आला होता.


पोलिसांनी मांडली ट्रँगल थिअरी


पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर जय चावडा आणि शिवजित सिंग यांच्या चौकशीतून जी माहिती समोर आली आहे त्यावरुन पोलिसांनी एक ट्रँगल थिअरी मांडली आहे. जय चावडा आणि शिवजीतच्या जबानीत काहीशी तफावत आढळून आल्याने या हत्याप्रकरणाबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. मात्र, पोलिसांच्या अंदाजानुसार या हत्येचे पहिले कारण म्हणजे अर्शदने जय चावडा याच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. हे पैसे अर्शदने परत दिले नव्हते. याच वादातून त्याची हत्या झाली असावी, हा पोलिसांचा पहिला अंदाज आहे. दुसऱ्या थिअरीनुसार, अर्शद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याची पत्नीही मूकबधिर आहे. मात्र, त्याच्या पत्नीचे शिवजित सिंह याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. रविवारी दारु प्यायला बसल्यानंतर अर्शदच्या बायकोचा विषय निघाला आणि शिवजित सिंग याच्याशी त्याचा वाद झाला. हाच वाद विकोपाला गेला. तर शेवटची शक्यता म्हणजे अर्शद शेख याच्याकडे जय चावडाचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडमधील नाजूक क्षणांचे काही व्हीडिओ होते. हेच इंटिमेट व्हीडिओ दाखवून अर्शद शेख हा जय चावडला ब्लॅकमेल करत असावा, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, यापैकी नक्की कोणती थिअरी घरी आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 


पोलिसांना तो व्हीडिओ मिळाला


जय चावडा, शिवजित सिंग आणि अर्शद शेख रविवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे दारु प्यायला बसले होते. तेव्हा दारू संपली आणि जय चावडा आणखी दारु आणण्यासाठी घराबाहेर गेला. त्यावेळी शिवजित सिंग आणि अर्शद शेख यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा शिवजित सिंग याने अर्शदचे कपडे उतरवून त्याचे हात बांधले. यानंतर शिवजितने अर्शदला मारहाण केली. त्याने एक बाटली फोडून अर्शदच्या शरीरावर ओरखडे ओढले. दारु आणायला गेलेला जय चावडा घरी परतला तेव्हा त्याने हा प्रकार बघितला. त्याने हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शुट केला. शेवटी शिवजितने हातोडीने अर्शद शेखच्या डोक्यात घाव घातला, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हा व्हीडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.


जय चावडा याने आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी हा व्हीडिओ शूट केल्याचे पोलिसांना सांगितले. मी शिवजित सिंहला मदत केली नसती तर त्याने मलाही ठार मारले असते. त्यामुळे मी अर्शद शेखचा मृतदेह बॅगेत भरुन त्याची विल्हेवाट लावायला तयार झालो. मला तिथून पळ काढायचा होता म्हणून मी अर्शदचा मृतदेह असलेली बॅग घेऊन दादर स्थानकात आलो, असे जय चावडाने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. 


आणखी वाचा


दादर सुटकेस हत्याप्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी, बायकोचा विषय निघताच तीन मूकबधिरांचं भांडण, अर्शदला मित्रांनीच का मारलं?