4 April In History: आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या दृष्टीने आजच्या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या आजच्या दिवशी झाली. तर, पाकिस्तानमध्ये आजच्या दिवशी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर, भारताचे माजी गोलंदाज बापू नाडकर्णी यांचा जन्मदिवस.
1889 : पंडित माखनलाल चतुर्वेदी यांचा जन्मदिन
सन 1889 साली पद्मभूषण आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भारतीय कवी, लेखक, निबंधकार, नाटककार आणि पत्रकार पंडित माखनलाल चतुर्वेदी यांचा जन्मदिन. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. 1921 मध्ये त्यांनी स्वातंत्र्यआंदोलनात भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. प्रभा, कर्मवीर, प्रताप ह्या नियतकालिकांचे ते संपादक होते. भरतपूर येथील ‘संपादक संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
1933 : डावखुरे गोलंदाज बापू नाडकर्णी यांचा जन्म
भारतीय क्रिकेट इतिहासात आपल्या धारदार गोलंदाजीने मानाचे स्थान मिळवणारे बापू नाडकर्णी यांचा आज जन्म दिवस. नाडकर्णी यांनी 12 जानेवारी 1964 रोजी मद्रास येथे इंग्लंडविरुद्ध एकही धाव न देता सलग 21.5 षटके (131 चेंडू) टाकली. हा एक विक्रम आहे. बापू नाडकर्णी हे आपल्या टिच्चून गोलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली.
1949 : (NATO) या संस्थेची स्थापना
पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा 12 देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.सन 1949 साली पश्चिम युरोपियन राष्ट्र व उत्तर अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये संरक्षणविषयक करार म्हणजेच उत्तर अटलांटिक करार (‘नाटो’ करार) वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये करण्यात आला. पश्चिम युरोपातील अकरा देश व अमेरिका अश्या 12 देशांमध्ये हा करार झाला.
1968 : मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या
कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या करण्यात आली. मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर हे एक अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. अमेरिकेतील समान नागरी अधिकारासाठी त्यांनी अहिंसक मार्गाने संघर्ष उभारला.
1979 : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना आजच्या दिवशी फासावर लटकवण्यात आले. . पाकिस्तान पीपल्स पार्टी या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचा तो संस्थापक होते. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो ही त्यांची कन्या होती. पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमाला त्यांनी चालना दिली. त्यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला. पाकिस्तान लष्करशहा अयुब खान यांची सत्ता आली होती. त्यांच्या सरकारात भुट्टोंना मंत्री पद मिळाले. अयुब खानांची मर्जी त्यांनी लवकर संपादन केली. 1962 साली त्यांना परराष्ट्रमंत्री पदी बढती मिळाली.
1971 साली बांगला मुक्तिसंग्रामात पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला. अशा आव्हानात्मक कालखंडात झुल्फिकार अली भुट्टोंनी पाकिस्तानाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे ताब्यात घेतली. लगोलग भारतासोबत शिमला करार करत, पराभूत राष्ट्र असूनही पाकिस्तानाला सोयीचा ठरणारा करार केल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली.
इस्लामी कट्टरपंथी आणि महत्त्वाकांक्षी लष्करशाहीच्या कचाट्यात ते सापडले. शरिया लागू करण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दडपण वाढू लागले. त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे सतत आरोप होऊ लागले. स्वतःचे पद भक्कम ठेवण्यासाठी त्यांची वृत्ती काहीशी हुकुमशहा पद्धतीची झाली. त्यांनी लष्कर व पोलिसदलांशिवाय पंतप्रधानांच्या आधिपत्याखालील स्वतंत्र सशस्त्र दल निर्माण केले. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात एकत्र येत व्यापक आंदोलन पुकारले. त्यातच 1977 सालातल्या निवडणुकींत घोटाळ्याचे आरोप झाले. सुरुवातीस या आरोपांचा ठामपणे नकार देणाऱ्या भुट्टोंनी अचानक काही प्रमाणात गैरप्रकार झाल्याची कबुली दिली. याचे निमित्त करून जनरल झिया उल हक यांनी लष्करी उठाव केला. भुट्टोंना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
इतर महत्त्वाच्या नोंदी
1617: स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक जॉन नेपिअर यांचे निधन.
1882: ब्रिटनमध्ये पहिली इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडनमध्ये सुरू झाली
1929: मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक कार्ल बेन्झ यांचे निधन.