Mumbai Crime : मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील खार (Khar) इथे एका परदेशी महिला (Foreign Women) यूट्यूबरचा (YouTuber) विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही तरुणी व्हिडीओ शूट करत असताना स्थानिक तरुणांनी तिची छेड काढली. संबंधित तरुणी ही दक्षिण कोरियाची (South Korea) नागरिक आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खार पोलिसांनी या प्रकरणी सुमोटा गुन्हा दाखल करुन घेत आरोपी तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. मोबीन चांद मोहम्मद शेख (वय 19 वर्षे) आणि मोहम्मद नकीब सदरेआलम अन्सारी (वय 20 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी ही तरुणी खार रेल्वे स्थानकाजवळील रोड नंबर पाचवर लाईव्हस्ट्रीमिंग करत होती. यावेळी तिथे दोन तरुणांनी तिचा हात पडकून खेचण्याचा, जबरदस्ती करण्याचा आणि चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र या तरुणीने त्यांना दूर केलं. ही तरुणी घटनास्थळावरुन दूर जाऊ लागल्यानंतर तोच तरुण आपल्या एका मित्रासह बाईकवरुन पुन्हा तिच्या दिशेने आला आणि तिला जिथे जायचं आहे सोडण्याची ऑफर दिली. मात्र तिने त्याची ऑफर नाकारली, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
यूट्यूबरच्या फॉलोअरने संबंधित प्रकार ट्विटरवर शेअर केला
हा सर्व प्रकार तिच्या एका फॉलोअरने मुंबई पोलिसांना मेंशन करुन संबंधित व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. त्यात लिहिलं आहे की, "पीडित तरुणी ही दक्षिण कोरियाची नागरिक आहे. खार परिसरात लाईव्हस्ट्रीमिंग करत असताना काही स्थानिक तरुणांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलं."
तरुणीचं ट्वीट
दरम्यान संबंधित यूट्बूरने देखील या घटनेबाबत ट्वीट केलं आहे. तिने लिहिलं आहे की, काल रात्री लाईव्हस्ट्रीमिंगदरम्यान एका तरुणाने मला त्रास दिला. हे प्रकरण फार वाढू नये आणि तिथून निघून जाऊ यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केला, कारण तो त्याच्या मित्रासोबत होता. पण काही लोकांनी म्हटलं की मी फारच फ्रेण्डली वागू लागल्यामुळे आणि बातचीत सुरु केल्यामुळे हा प्रकार घडला. या घटनेने मला स्ट्रीमिंगबाबत पुन्हा एकदा विचार करण्यासाठी भाग पाडलं आहे.
सुमोटो गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या
त्यानंतर तात्काळ खार पोलीस ठाणे सतर्क झाले. त्यांनी या प्रकरणाली तरुणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तरुणी जबाब देण्याचा स्थितीत नव्हती. अखेर खार पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करत या तरुणांचा शोध सुरु केला. वांद्रे येथील रहिवासी असलेल्या या तरुणांना खार पोलिसांनी काल (30 नोव्हेंबर) रात्री अटक केली आहे. मात्र या प्रकरणाचा सोशल मीडियावर जोरदार निषेध सुरु झाला आहे.