Aurangabad Rickshaw Drivers Strike : आपल्या विविध मागण्यासाठी औरंगाबाद (Aurangabad) शहरातील रिक्षाचालकांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय आहे. त्यामुळे आज सकाळपासून रिक्षा बंद (Rickshaw Drivers Strike) ठेवण्याची घोषणा औरंगाबाद रिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे. तर या संपात तब्बल 15 रिक्षा चालक संघटनांचा सहभाग पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज औरंगाबादकरांचे हाल होण्याची शक्यता असून, घराबाहेर निघताना पर्यायी वाहतुकीची सोय प्रवाशांना करावी लागत आहे.


रिक्षा चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, रिक्षा चालक-मालक समितीतर्फे आरोप 
वारंवार मागण्या करूनही रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप रिक्षा चालक-मालक समितीतर्फे करण्यात आला आहे. तर अनेकदा रीतसर निवेदन देऊन देखील आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरातील विविध 15 रिक्षा चालक-मालक संघटनांनी आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्या औरंगाबादकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. तर आज सकाळी रेल्वे स्थानकावर रेल्वेने आलेल्या प्रवाशांना ताटकळत उभा राहण्याची वेळ आल्याची चित्र पाहायला मिळाले.


"28 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ द्या"


रिक्षाचे इन्शुरन्स, पीयुसी, टॅक्स, मीटर कॅलिब्रेशन करणे, फिटनेस, वाहन पासिंग करणे इत्यादी कागदपत्रांसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ मिळाली तर सर्व वाहन चालक व मालकांना दिलासा मिळू शकतो,अशी प्रमुख मागणी रिक्षाचालक संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच ट्रॅफिक पोलिसांकडून सुरू असलेली मोहीम बंद करून रिक्षा चालकांना होणारा मनस्ताप थांबवण्याची मागणी सुद्धा रिक्षाचालक संघटनांनी केली आहे.


'या' आहेत रिक्षाचालकांच्या मागण्या...


-रिक्षा चालवताना मीटर कॅलेब्रेशनसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी.


-रिक्षाचे इन्शुरन्स, पीयुसी, टॅक्स, मीटर कॅलिब्रेशन करणे, फिटनेस, वाहन पासिंग करणे इत्यादी कागदपत्रांसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ मिळावी.


-वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची मोहिम बंद करण्यात यावी.


-एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस स्टेशनमधील कर्मचारी 283 च्या कलमाखाली रिक्षा चालकांचे गुन्हेगारीमध्ये परावृत्त करत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांचे भविष्य धोक्यात आहे.


-रिक्षा चालकांच्या भविष्याचा विचार करून 283 च्या कलमाखाली रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करू नयेत.


-वाळूज एम. आय. डी. सी. ते सिडको, हडकोमध्ये प्रायव्हेट सेक्टर कंपनीच्या बस चालकांकडून अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही.


-फक्त रिक्षा चालकांनाच दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात येत आहे.


 


संपात 'या' संघटनांचा सहभाग!


बहुजन हिताय रिक्षा चालक मालक संघटना


शिव वाहतूक सेना


वस्ताद वाहतुक दल


रोशन ऑटो युनियन


अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी रिक्षा चालक-मालक संघटना


वाय. एफ. खान रिक्षा युनियन


परिवर्तन ऑटो चालक-मालक संघटना


महाराष्ट्र रिक्षा चालक सेना


महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना


काँग्रेस रिक्षा युनियन


मराठवाडा ऑटो रिक्षा युनियन 


पँथर पॉवर रिक्षाचालक-मालक संघटना


महाराष्ट्र वाहतूक सेना 


मराठ मावळा संघटना


रिपाई चालक-मालक संघटना