बोरिवली, मुंबई : मैत्रिणींवर, प्रेयसीवर आपली छाप सोडण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करतात. मात्र, एका महाभागाने तर आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी दुचाकी चोरत असे. या चोर रोमिओला बोरिवली पोलिसांनी (Borivali Police) बेड्या घातल्या आहेत. पोलिसांनी या आरोपीकडून सहा दुचाकी (अॅक्टिव्हा, स्कूटी) जप्त केल्या आहेत.
अनिल भीमराव निंबाळकर असे या 23 वर्षीय चोराचे नाव आहे. आरोपी अनिल निंबाळकर हा काही मिनिटांत स्कूटी चोरून पळून जायचा. बोरिवली पोलिसांनी आरोपींकडून 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रेयसीला खुश करण्यासाठी आरोपी रोज नवीन अॅक्टिव्हा, स्कूटी चोरायचा. चोरी केलेली एक्टिवा घेऊन तो आपल्या मैत्रिणी सोबत दिवस घालवत असे. जिथे दुचाकीमधील पेट्रोल संपायचे. त्याच ठिकाणी दुचाकी सोडून दुसरी दुचाकी चोरून पळून जायचा.
असा लागला छडा
बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कूटी, अॅक्टिव्हा सारख्या दुचाकी चोरीच्या घटना वाढत होत्या. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरी गेलेल्या दुचाकींचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेज आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी मालाड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी पथक तयार केले. त्यानंतर आरोपीला मालाड येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या.
बोरिवली पोलिसांनी बोरिवली, दहिसर, चारकोप आदी ठिकाणी 6 गुन्हे शोधले आहेत. आरोपी अनिल भीमराव निंबाळकर (23 वर्षे) हा मालवणी येथील रहिवासी आहे. आरोपी अनिल हा मेकॅनिकचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात चोरी प्रकरणी गु्न्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोटर मेकॅनिक असल्याने त्यातील ज्ञान वापरून आरोपी क्षणात दुचाकी घेऊन पळून जायचा अशी माहिती परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त अजय बन्सल यांनी दिली.
चोरी करणाऱ्या प्रियकराला अटक
या आधीदेखील राज्यात विविध ठिकाणी प्रेयसींसाठी चोरी करणाऱ्या चोर प्रियकरांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. मे महिन्यातच, प्रेयसीला फिरवण्यासाठी मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले. विठ्ठलवाडी पोलिसांनी ही कारवाई केली होती. हर्ष थापा (20 वर्ष) असे मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून, तो उल्हासनगर परिसरात राहणारा आहे. लव्हस्टोरीमधील प्रेमिकेला फिरवण्यासाठी तीन मोटारसायकली चोरल्याचे त्याने कबूल केले. आरोपी हर्ष थापा हा उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळील सप्तश्रृंगी अपार्टमेंट सोसायटीमधील वॉचमनचा मुलगा आहे.