मुंबई : भिवंडी शहरात हादरवून सोडणारी एक घटना घडली आहे. येथे खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने नऊ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. हे कृत्य करून आरोपी फरार झाला असून या घटनेमुळे अल्पवयीन मुलीचे कुटंबीय हादरून गेले आहेत. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.


चाळीत राहायचे कुटुंबीय


मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शांतीनगर परिसरातील गोविंद नगर येथील एका दुमजली चाळीत एक कुटुंब राहत होते. आई-वडील दोन मोठ्या बहिणी व एक भाऊ व सर्वात छोटी पीडिता असे कुटुंब त्याठिकाणी वास्तव्यास  होते. वडील यंत्रमाग कारखान्यात तर आई गोदामात कामाला जाते. आई आपल्या दोन्ही मोठ्या मुलींनाही सोबत कामाला घेऊन जात होती. तर भाऊ शाळेत जात होता.


खाऊ देण्याच्या बहाण्याने खोलीत बोलावले


गुरुवारीदेखील हे कुटुंब नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. मुलगा दुपारी शाळेत गेला असताना त्यासुमारास त्याच चाळीच्या वरच्या मजल्यावर एकटाच राहणाऱ्या नराधमाने पीडित चिमुरडीस खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले. मुलीने आपली खोली कुलूप लाऊन बंद केली व ती त्या नराधमाच्या खोलीत गेली. तेथे नराधमाने तिच्यावर अत्याचार करून धारदार वस्तूने वार करून तिची हत्या केली.


कडी लावलेल्या एका खोलीत पीडितेचा मृतदेह


सायंकाळी शाळेतून भाऊ घरी आला. खोलीला कुलूप बघून त्याने बहिणीला शोधले पण ती सापडली नाही. त्यानंतर आई व मोठ्या बहिणी कामावरून घरी परतल्या. त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली असता परिसरातील एका छोट्या मुलाने पीडित मुलीला वरच्या मजल्यावरील खोलीत जाताना बघितल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी शोध घेतला असता घराला बाहेरून कडी लावलेल्या एका खोलीत पीडितेचा मृतदेह आढळला. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला देह पाहून मुलीच्या कुंटबीयांनी एकच टाहो फोडला. 


एकजण ताब्यात, तपास चालू


या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचा फौजफाटा परिसरात दाखल झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयात रवाना केला होता. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता मृतदेह शास्त्रोक्त उत्तरीय तपासणीसाठी मुंबई जे जे रुग्णालयात पाठवला आहे. तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरातून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.  या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा :


धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू


VIDEO : महिला डॉक्टरने प्रियकराचं गुप्तांग कापून फ्लश केलं, लग्नाला नकार दिल्याने टोकाचं पाऊल; धक्कादायक व्हिडीओ समोर