संगमनेर : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या दोन्ही मुलांना आईनेच संपवल्याची धक्कादायक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. आईनेच प्रियकराच्या साथीने मिळून दोन मुलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. सुमारे दोन महिन्यानंतर पोलिसांना दोन्ही मुलांच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात यश आलं आहे. आईच आपल्या मुलांच्या जीवावर उठली असल्याचं या घटनेत समोर आलं असून दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दोन्ही मुलं तळ्यात बुडून मेल्याचा बनाव
दोन महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद देखील केली. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याचा संशय गावकऱ्यांना आलेला होता. आता दोन महिन्यानंतर या दोन संख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर, घातपात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. धक्कदायक बाब म्हणजे आपल्या प्रेमात अडथळा असणाऱ्या मुलांना जनमदात्या आईने आणि तिच्या प्रियकरानेच शेततळ्यात ढकलून संपविल्याचं एका साक्षीदाराच्या साक्षीने उघड झालं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
दोन्ही मुलं तळ्यात बुडाल्याचा बनाव
17 एप्रिल 2024 रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (वय 12 वर्ष) आणि प्रणव सारंगधर पावसे (वय 8 वर्ष) या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. वर्षभर अगोदरच मुलांच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत होती आणि मुलांचा देखील शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनेकदा व्यक्त केला. मात्र,पुरावे नसल्याने पोलिस तपासात यश आले नाही.
प्रियकरासाठी आईनेचं पोटच्या मुलांचा काटा काढला
तब्बल दोन महिन्यानंतर एका साक्षीदाराने दिलेल्या जबाबावरून हा अपघात नव्हे तर खून असल्याचं समोर आले असून या दोन्ही मुलांचा घातपात जन्मदाती आई कविता सारंगधर पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे यांनी केला असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सचिन बाबाजी गाडे आणि मयत मुलांची आई कविता या दोघांना अटक केली असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :