मुंबई : अभिनेत्री रविना टंडनच्या (Raveena Tandon) कारने एका महिलेला धडक दिल्याचा व्हिडीओ (Raveena Tandon car acciden Video) काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या घटनेनंतर टंडन आणि काही लोकांमध्ये बाचाबाची झाली होती. याच घटनेसंदर्भात आता नवी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविना टंडनने या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल करणाऱ्या मोहसीन शेख या व्यक्तीला एक नोटीस पाठवली आहे. त्यानंतर आता मोहसीन शेख यांनीदेखील गोरेगाव पोलीस ठाण्यात रविना टंडन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शेख यांच्या या निर्णयानंतर आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
रविना टंडन यांच्याकडून अब्रुनुकसानीची नोटीस, 100 कोटींचा दावा
रविना टंडन आणि वृद्ध महिलेशी झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ मोहसीन शेख यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता. या घटनेनंतर रविना टंडन यांनी 100 कोटींच्या अब्रुनुकसानीची एक नोटीस पाठवली आहे. या नोटिशीनंतर आता मोहसीन शेख यांनी थेट गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. शेख यांचे वकील काशिफ खान यांनी टंडन यांच्याविरोधात धमकी देणे, खंडणी मागणे, प्रकरणाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे, खोटे बोलण्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
टंडन यांच्याकडूनच व्हिडीओ डिलीट न करण्याचा सल्ला
अॅड. काशिफ खान यांनी टंडन यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. रविना टंडन यांनी मोहशीन शेख यांना घरी बोलावले होते. तसेच रविना टंडन आणि अन्य एका गटात त्या दिवशी बाचाबाची झाली नसेल तर मग टंडन जखमी कशा झाल्या होत्या? रविना टंडन यांची एक चॅटिंगही समोर आली आहे. त्यांनी स्वत:च मोहसीन शेख यांना वृद्ध महिलेसोबत घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ डिलीट न करण्याचा सल्ला दिला होता, असा दावा अॅड. काशिफ खान यांनी केला आहे.
रविना टंडन यांची भूमिका काय?
दरम्यान, रविना टंडन यांच्या वकील सना खान यांनी मोहसीन शेख यांच्या भूमिकेवर स्विस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शेख यांनी फक्त तक्रार दिलेली आहे. आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस ठाण्यात फक्त एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. रविना टंडन यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे सना खान म्हणाल्या आहेत.
हेही वाचा :
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची