Forex Reserve Increased : देशाच्या तिरोजीत मोठी भर पडली आहे. परकीय चलनाच्या (Forex Reserve) गंगाजळीत मोठी वाढ झालीय. गेल्या दोन आठवड्यात देशाच्या तिजोरीत 9 अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 76 हजार कोटी रुपये आले आहेत. 7 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 4.307अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 36 हजार कोटी रुपयांची वाढ झालीय. परकीय गंगाजळीत वाढ हे अर्थव्यवस्थेसाठी (Economy) चांगले लक्षण मानले जात आहे. याचा परिणाम देशांतर्गत चलन मजबूत होण्यात होतो. 


भारत आपली निर्यात वाढवत असल्याचे चित्र दिसत आहे. तर आयात मर्यादित करण्याची भारताची योजना आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत परकीय चलन साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या एका आठवड्यात, आपण परकीय चलन साठ्यात 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ पाहिली आहे. परकीय चलन गंगाजळी सलग दोन आठवड्यांत 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ आहे. 


देशाचा परकीय चलनसाठा विक्रमी पातळीवर


7 जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात 4.307 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 36 हजार कोटी रुपयांची वाढ होऊन 655.817 अब्ज डॉलरचा नवा उच्चांक गाठला आहे. मागील आठवड्यात परकीय चलनाचा साठा 4.837अब्ज डॉलर्स म्हणजेच 40 हजार कोटी रुपयांच्या वाढीसह 651.51 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता. यापूर्वी 10 मे रोजी परकीय चलन साठ्याची सर्वोच्च पातळी 648.87 अब्ज डॉलर होती. गेल्या काही आठवड्यांत परकीय चलनाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.


चालू वर्षात परकीय चलनासाठ्यात 2.72 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ


गेल्या दोन आठवड्यांबद्दल बोलायचे झाले तर देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात 9.14 अब्ज डॉलर्स म्हणजेच 76 हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे देशाचा परकीय चलनाचा साठा 650 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचलाच नाही तर त्याहूनही पुढे गेला आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, चालू वर्षात आतापर्यंत 32.62 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2.72 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, चालू वर्षात देशाचा परकीय चलन साठा 700 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचू शकतो.


IMF मधील भारताच्या राखीव ठेवीतही झाली वाढ 


दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, चलन साठ्याचा महत्त्वाचा भाग मानल्या जाणाऱ्या विदेशी चलन संपत्ती 7 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 3.773 अब्ज डॉलरने वाढून 576.337 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा साठा 481 दशलक्ष डॉलरने वाढून 56.982 अब्ज डॉलर झाला आहे. SDR 43 दशलक्ष डॉसरने वाढून 18.161 अब्ज डॉलर झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताच्या राखीव ठेवी देखील 10 दशलक्ष डॉलर्सनी वाढून 4.336 अब्ज डॉलर्स झाल्या असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.  


महत्वाच्या बातम्या:


विदेशी संपत्तीनं भारताची तिजोरी भरली! महिनाभरात तिजोरीत आले 1.37 लाख कोटी; सविस्तर माहिती एका क्लिकवर