ठाणे : मिरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये व्यावसायिकावर झालेल्या गोळाबार प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा 1 च्या युनीटने 24 तासांत या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या फेरीवाल्यांच्या जागेच्या वादावरुन झाल्याचं म्हटलं आहे. मात्र मयत आरोपी हा एका गुन्ह्यात साक्षीदार होता आणि त्याला दोन दिवसापूर्वी धमकीही देण्यात आली होती. पकडण्यात आलेला आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल असताना पोलिसांनी त्याच्यावर तडीपारची कारवाई केली नव्हती. एका आरोपीसोबत मिरा रोडचे डीसीपी प्रकाश गायकवाड यांचा फोटो व्हायरल झाला असून त्या फोटोच्या आधारावर आरोपी फेरीवाल्यांना धमकावत असायचा आणि त्यांच्याकडून पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.  


शुक्रवारी दिनांक 3 जानेवारीला रात्री सव्वा नऊच्या दरम्यान शांती शॉपिंग सेंटर मध्ये एका अज्ञात व्यक्तीने मयत शम्स तबरेज अन्सारी उर्फ सोनू याच्या डोक्यात गोळी घालून हत्या केली होती. याप्रकरणात गुन्हे शाखा 1 च्या युनिटने अवघ्या 24 तासाच्या आत गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पिस्तुलासह दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं आहे. 


युसुफ आणि मयत सोनूमध्ये वाद


आरोपी मोहम्मद युसुफ मन्सुरअली आलम आणि त्याचा भाऊ सैफअली मन्सुरअली खान असं आरोपींची नावं आहेत. तर ज्या आरोपीने गोली मारली तो अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरीवाल्यांच्या जागेवरुन युसुफ आणि मयत सोनू यांच्यात वाद होता आणि या वादातून हत्या झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


पोलिसांनी जागेचा वाद सांगितला असला तरी, बाबा कासम अली शेख आणि त्यांची मुलगी आसिया वाहिद उल्डे यांनी केलेल्या आरोपावरुन या गुन्ह्यात एक नवीनच बाब समोर आली आहे. आसिया हिच्या म्हणण्यानुसार, आरोपी युसुफ अन्सारीवर 24 एनसी आणि 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची प्रक्रियाही सुरु होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव पोलिस आयुक्तांना पाठवला होता. त्याची चौकशी झोन 1 चे पोलिस उप-आयुक्त प्रकाश गायकवाड हे करत होते. 


पोलिस अधिकाऱ्यासोबत आरोपीचा फोटो


प्रकाश गायकवाड यांचा एक फोटो युसुफ सोबत असल्याचा समोर आलं आहे. युसुफ तोच फोटो दाखवून तेथील फेरीवाल्यांना धमकवायचा आणि आपली तडीपारी रद्द केली अशी वल्गना करायचा. युसुफ याने आसिया गरोदर असताना तिला मारहाण  केली होती. त्याच गुन्ह्यात मयत शम्स अन्सारी हा साक्षीदार होता. 


गुन्ह्याचा साक्षीदार असल्यानेच हत्या


या घटनेच्या दोन दिवस आगोदर शम्सला युसुफच्या साथीदारांनी गुन्ह्यातून नाव हटवून घे, अन्यथा तुझी हत्या करु अशी धमकी दिली होती. आरोपी युसुफ मंसूर आलम हा नामचीन गुंड असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असताना पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव का रखडवला? 2023 मध्येही युसुफवरील तडीपारची कारवाई का रद्द केली? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. त्यावर पोलीस आयुक्तांनी याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केलीय.   


यूसुफ मीरा रोड स्टेशनच्या बाहेर अवैध फेरीवाल्यांचा व्यवसाय चालवायचा. त्या फेरीवाल्यांकडून हप्ते ही गोळा करत असल्याची माहिती आहे.  महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील काही लोक या कामात त्याला मदत करत होते. याच कारणास्तव तो कुणालाही घाबरत नव्हता आणि त्याच्या विरोधात जाणाऱ्याला तो मारहाण करायचा. मात्र त्याच्यावर कुणीही कारवाई न केल्यामुळे त्याची दादागिरी एवढी वाढली की एका निष्पापाला आपला जीवच गमवावा लागला. 


ही बातमी वाचा :