Thane Crime News: मिरा रोड येथे बागेश्वर धाम सरकार उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्या 18 आणि 19 मे च्या प्रवचन कार्यक्रमात चोरी झालेल्या दागिन्यांचा शोध लागला आहे. काशिमीरा येथील गुन्हे शाखा कक्ष १ आणि मिरारोड पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे तपास केला. या तपासात गुन्ह्यात चोरी केलेले 50 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या चोरी प्रकरणी आठ आरोपींना अटक ही करण्यात आली आहे. त्याच बरोबर चोरीला गेलेले दागिने नागरिकांना पोलीस आयुक्तांनी परत ही केले आहेत.
मिरा रोड येथील एस. के. स्टोन कोस्टल पोलीस चौकीच्या मागे असलेल्या मैदानात 18 मार्च आणि 19 मार्च 2023 रोजी बागेश्वर धाम सरकार यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या प्रवचनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. जवळपास एक लाखाच्या आसपास गर्दी झाली होती. या सत्संग कार्यक्रमासाठी आलेले पुरुष व महिला भाविकांपैकी सुमारे 60 महिला आणि एका पुरुषाच्या गळ्यातील सुमारे 910 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरांनी लंपास केले होते. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता.
भाविकांनी केलेल्या तक्रारीनंतर मिरा रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष 1, काशिमीरा आणि मिरा रोड पोलीस ठाणे यांनी केलेला होता. या गुन्ह्यांच्या तपासात कार्यक्रमाच्या ठिकाणाहून स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती, मोबाईलचे तसेच घटनास्थळावरील त्याशिवाय मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. चौकशीअंती गुन्हे करणारे आरोपी हे राजस्थान मधील भरतपूर व अलवर जिल्हयातील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी मिळवली. यातील आरोपी महिला आणि पुरुष हे संघटीतपणे चोरी करत असे. धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमाचे ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन ज्या इसमांची चोरी करायची आहे त्याच्या भोवती गराडा करुन त्याच्या गळ्यातील मंगळसूत्र, चैन, हार असे दागिण्यांची चोरी करुन, त्याच टोळीपैकी म्होरक्या असलेल्या पुरुष किंवा महिलाकडे चोरी केलेले दागिने देत असे. दागिने हाती आल्यानंतर तो मोहरक्या थेट गावी निघून जातो. तर इतर चोरी करणारे पुरुष आणि महिला हे पुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याच प्रकारे चोरी करतात, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
तपासात आरोपी हे सराईत चोर असल्याने त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करणे हे अत्यंत जोखमीचे होते. यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी पोलिसांची चार विशेष पथके बनवून, राजस्थानला पाठवले. हे पथक राजस्थान मधील भरतपूर अलवर या धोकादायक परिसरात राहून, 30 दिवसात आठ आरोपींना अटक केले.
गीतादेवी सरदार सिंग, सेतू करमबीर सिंग, अर्जुन सिंग बीरेंद्र बावरिया, हेमा उर्फ हिरोदेवी सूरज, पिंकी सूर्यप्रताप सिंग उर्फ राहुल, रेश्मा हिराराम बावरिया उर्फ संत्रा बिरेंदर बावरिया, सोनिया अनिल कुम्हार आणि रणजितकुमार उर्फ प्रवीणकुमार जगदीश प्रसाद बावरिया अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेला 50 लाख रुपये किमतीचे 828 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व लगडी असा मुद्देमाल ही पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा सर्व मुद्देमाल नागरीकांना हस्तातंरीत केला आहे. नागरीकांनी पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.