IPL 2023, SRH vs LSG : मोक्याच्या क्षणी निकोलस पूरन याने वादळी फलंदाजी करत लखनौला विजय मिळवून दिला.  हैदराबादला घरच्या मैदानावर सात विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या नवाबांनी दिलेले १८३ धावांचे आव्हान लखनौच्या नवाबांनी सात विकेट राखून सहज पार केले. लखनौकडून प्रेरक मंकड याने संयमी अर्धशतकी खेळी केली. तर निकोलस पूरन याने झंझावाती फलंदाजी केली. या विजयासह लखनौने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लखनौ संघ प्लेऑफच्या दिशेन आगेकूच करत आहे. तर दुसरीकडे हैदराबादचे प्लेऑफमधील आव्हान खडतर झालेय. 


१८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात निराशाजनक झाली होती. काइल मेयर्स झटपट बाद झाला. मेयर्स याला १४ चेंडूत फक्त दोन धावा काढता आल्या. त्यानंतर क्विंटन डि कॉक आणि प्रेरक मंकड यांनी लखनौच्या डावाला आकार दिला. पण क्विंटन डि कॉक २९ धावांवर बाद झालाय. डिकॉक याने १९ चेंडूत एक षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने २९ धावांचे योगदान दिले. डिकॉक बाद झाल्यानंतर प्रेरक आणि स्टॉयनिस यांनी लखनौच्या डावाचा पाया रचला.


प्रेरक मंकड याने संयमी फलंदाजी करत एक बाजू सांभाळली. दुसऱ्या बाजूला स्टॉयनिस याने पहिल्यांदा फटकेबाजी केली. स्टॉयनिस याने २५ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने तीन षषटकार आणि दोन चौकार लगावले. तर निकोलस पूरन याने नाबाद ४४ धावांची खेळी करत विजाचा कळस लावला. निकोलस पूरन याने अवघ्या १३ चेंडूतचार षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने ४४ धावांचे योगदान दिले. अभिषेक शर्माच्या एका षटकात तब्बल ३१ धावा काढल्या. स्टॉयनिस याने आधी दोन षटकार लगावले.. तिसऱ्या चेंडूवर स्टॉयनिस बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन याने लागोपाठ तीन षटकार लगावले. याच षटकात सामना लखनौच्या बाजूने फिरला. प्रेरक मंकड याने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. मंकड याने ४५ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. प्रेरक मंकड याने डिकॉकसोबत ३० चेंडूत ४२ धावांची भागिदारी केली. त्यानंतर स्टॉयनिससोबत तिसऱ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ७३ धावांची भागिदारी केली. तर निकोलस पूरन याच्यासोबत२३ चेंडूत ५८ धावांची भागिदारी केली.



हैदराबादच्या गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. मयंक मार्कंडेय, अभिषेक शर्मा आणि ग्लेन फिलिप यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. इतर गोलंदाजांची पाटी रिकामीच राहिली.