अहमदनगर : समाजात मुलींची संख्या कमी झाल्यामुळे कित्येक मुले लग्नापासून (Marriage) वंचित आहेत. मुलाला सरकारी नोकरी हवी किंवा पुणे, मुंबईत फ्लॅट हवा, अशा अवाढव्य मागण्यांमुळे गावाकडी शेतकरी कुटुंबातील शेती करणारी मुले लग्नासाठी दारोदार भटकत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र, अशा लग्नाळू तरुणांना हेरुन त्यांची फसवणूक करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अहमदनगरच्या श्रीगोंदा (Shrigonda) पोलिसांनी (Police) मुलीचं लग्न लावून देणाऱ्या अशाच एका टोळीला जेरबंद केलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका तरुणाकडून दोन लाख 15 हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन नावाच्या मुलीशी लग्न करण्यात आले. विशेष म्हणजे लग्नानंतर लगेचच या मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उगले कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या मुलीसह टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 


"सिमरन" नाव ऐकलं की, "जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी" हा डायलॉग आठवतो. खरं तर "दिलवाले दुल्हनिया ले जायंगे" या चित्रपटातील प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी संघर्ष करणारी सिमरन सर्वांनाच भावते. मात्र, श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने आठ महिन्यांत तब्बल 9 तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांना चुना लावल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण 7 आरोपींना गजाआड केले आहे. पोलिस तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन हिने तिची आई आणि इतर 5 साथीदारांसह गुजरात, मध्य प्रदेश, हैदराबाद, मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ मोठ्या रकमा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. या टोळीने आणखी दोन तरुणांना फसविण्याचा कट रचला होता. मात्र, त्या आधीच मुंगुसगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठगांना गजाआड केले. याप्रकरणी मुंगुसगाव येथील तरुणाने 28 जून रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी या टोळीचा तपास सुरू करुन टोळीला अटक केली. पोलिसांनी या टोळीकडून फसवून घेतलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा एकूण 13 लाख 7 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना 11 दिवसांची कोठडी दिली आहे.


शेतकरी कुटुंबातील मुलांना हेरायचे आणि लग्नाचे आमिष दाखवून त्यांना फसवायचे, ही या टोळीची मोडस पद्धत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील नितीन उलगे या शेतकरी मुलाला अशाच पद्धतीने या टोळीने हेरलं आणि त्यांची फसवणूक केली. लग्न झाल्यानंतर नवरा मुलगा असलेल्या नितीनच्या आईला या टोळीवर संशय आला होता. त्या संबंधित माय लेकीवर लक्ष ठेवूनच होत्या आणि तसंच झालं. लग्नाची नोटरी करण्याच्या बहाण्याने सिमरनची आई आशा पाटील हिने नितीनच्या कुटुंबियांना श्रीगोंदा येथे नेले. आधीपासूनच तिथे असलेल्या त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने पळून जाण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, नितीनच्या आई मंदाबाई उगले यांनी हा डाव हाणून पाडला.


पोलिसांनी मागितले पैसै


स्थानिक नागरिकांच्या मदतीने उगले कुटुंबियांनी आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, शेख शाहरूख शेख फरीद, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ कर्णन गौतम पाटील ,सचिन बलदेव राठोड ऊर्फ राजूरामराव राठोड , युवराज नामदेव जाधव यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी कारवाईसाठी आणि इतर आरोपींच्या शोधासाठी उगले यांच्याकडूनच पैसे घेतल्याचा आरोप अशोक उगले यांनी केला आहे.


लग्न हा मोठा सामाजिक प्रश्न


सध्या मुलींची संख्या कमी असल्याने लग्नाचे आमिष दाखवून फसवणाऱ्या टोळ्या वाढल्या असून या सिमरनने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का हे पोलीस तपासात समोर येणार आहे. मात्र, मुलांचे लग्न हा मोठा सामाजिक प्रश्न तयार झाल्याचे या घटनेवरुन समोर आले आहे.