Sanjay Raut on Worli Hit And Run Case: मुंबई : वरळी (Worli Accident) हिट अँड रन प्रकरणातील (Hit And Run Case) मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. तसेच, अपघातावेळी गाडी मीच चालवत होतो, असा कबुलीजबाबही आरोपीनं दिलेला आहे. अशातच आरोपीनं ड्रग्ज घेतलेले, ते ब्लड टेस्टमध्ये येऊ नये म्हणून त्याला फरार केलं होतं, असा खळबळजनक दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यासोबतच संजय राऊतांनी वरळी अपघात प्रकरणावरुन मराठी फिल्म इंडस्ट्रीलाही झापलं आहे. मराठी अभिनेते जयंत वाडकर (Jaywant Wadkar) यांचे नाखवा नातेवाईक आहेत. आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या सहकाऱ्याचे नातेवाईक, अशा प्रकारे रस्त्यावर चिरडल्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसता? असा सवाल संजय राऊतांनी मराठी कलाकारांना विचारला आहे. 


ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत वरळी हिट अँड रन प्रकरणी बोलताना म्हणाले की, "मराठी अभिनेते जयंत वाडकरांचे नाखवा नातेवाईक आहेत. मी आता वाचलं त्यांच्याविषयी. कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री, एरव्ही काही कमेंट करत असतात किंवा सामाजिक कार्यकर्ते... त्यांनी बोललं पाहिजे ना? कसला टाळकुटेपणा करतेय मराठी फिल्म इंडस्ट्री, आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या सहकाऱ्याचे नातेवाईक, अशा प्रकारे रस्त्यावर चिरडल्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसता? कसला मराठीपणा आहे तुमच्यात?"


"वरळी हिट अँड रन प्रकरणात कावेरी नाखवा यांना सातत्यानं गाडीखाली चिरडण्याचा प्रकार झाला. हा नशेत असणारा नराधम, पैशाची मस्ती आणि नशा चढलेला नराधमच हे करू शकतो. रस्त्यावर निघृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना आरोपी तीन दिवस सापडत नाही. याबाबत कोणाला खरं वाटेल का? हे कोणाला खरं वाटेल का? त्याच्या शरीरातला नशेचा अंमल ब्लड टेस्टमध्ये येऊ नये. यासाठी तीन दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं", असं संजय राऊत म्हणाले. 


"व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेजवरुन दिसतंय की, या मुलानं नशा केली होती, बारमध्ये गेले होते आणि बाप सांगतोय मुलाला अपघात झाल्यावर पळून जा आणि ड्रायव्हरला गाडीवर बसवा. हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे आणि मुलाला फाशीची शिक्षा देण्याची विनंती मुंबई पोलिसांनी मागायला हवी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे.", असं संजय राऊत म्हणाले आहेत. 


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut PC: क्रॉस व्होटिंगची कुणाला भीती? आम्ही विधानपरिषदेच्या तिन्ही जागा जिंकू, राऊतांचा दावा



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


अपघातावेळी मिहीर शाह ड्रग्जच्या नशेत; ब्लड टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून...; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ