मुंबई : महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडे असलेल्या मनसुख हिरण या प्रकरणाचा तपास आता लवकरच एनआयएकडे (NIA) जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बद्दलची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एनआयए सध्या मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर मनसुख हिरण यांचा मृत्यूचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे आहे. मात्र, ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहे. ज्यामुळे मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपाससुद्धा एनआयएकडे जाणार असल्याची दाट शक्यता आहे.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. मात्र, विधानसभेमध्ये या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ माजला तर या केसमधील महत्त्वाचा दुवा असलेले मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्र्यातील खाडीत सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आणि सरकारला विरोधकांनी कोंडीत धरलं. ज्यानंतर मनसुख हिरण यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादी पथकाकडे सोपवण्यात आला तर सचिन वाझे यांची क्राईम इंटेलिजन्स युनिट मधून उचलबांगडी करण्यात आली.
एनआयएने तपास हाती घेताच युद्ध पातळीवर याची तपासणी सुरू केली आणि सचिन वाझे यांना चौकशीसाठी बोलावलं. बारा तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना एनआयएकडून अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली. म्हणजेच या केसचा तपास करत असलेला अधिकारीच या केसचा आरोपी निघाला आणि कायद्याच्या चौकटीत सापडला. मात्र, जर मनसुख हिरण प्रकरण सुद्धा एनआयएकडे गेलं तर सचिन वाझे यांची एनआयएच्या तावडीतून सुटका होण्यास अजून किती वेळ लागेल हे निश्चित नाही. जरी सुटका झाली तर दहशतवादी पथकाकडून त्यांची कस्टडी घेण्यात येईल.