Maharashtra Wardha Crime News : धार्मिक यात्रेकरिता गेलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक महिलेची आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीनं थोडीथोडकी नाहीतर तब्बल 76 लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. ही घटना वर्ध्यातील आरती टॉकीज येथील विद्यानगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेसोबत घडली. घटना कानी पडताच आणि फसवणुकीचा आकडा ऐकून नागरिकांना धक्काच बसला. घटनेतील आरोपीनं शिर्डीतील धर्मशाळा खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी करून मुख्याध्यापिका महिलेकडून वेळोवेळी पैसे उकळले. महिलेला आपली फसवणूक झाल्याचं समजताच थेट शहर पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी मेढा राजशेखर पुरुषोत्तम गुप्ता राहणार धर्मावरम, जिल्हा आनंतपूर, आंध्रप्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


धार्मिक यात्रेदरम्यान कर्नाटकात झाली होती आरोपीशी ओळख 


वर्धा शहरातील आरती टॉकीज येथील विद्यानगर परिसरात राहणाऱ्या मंगला श्रीराम घिरणीकर (65) या केसरीमल कन्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. घिरणीकर या 2016 मध्ये सेवानिवृत्त झाल्या. त्यांना जगभ्रमंतीची आवड असल्यानं त्यांनी विविध प्रांतात धार्मिक यात्रा काढण्याचं ठरवलं. मंगला घिरणीकर या धार्मिक यात्रेदरम्यान कर्नाटकात पोहोचल्या. तिथे त्या कुरवपूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानला भेट देण्यासाठी गेल्या असता त्यावेळी त्यांची ओळख आरोपी मेढा राजशेखर पुरुषोत्तम गुप्ता याच्याशी झाली. धार्मिक यात्रेचा प्रवास संपवून त्या आपल्या घरी वर्ध्याला परतल्या. त्यानंतरही आरोपी गुप्ता हा निवृत्त मुख्याध्यापिकेशी  फोनवर संपर्क ठेवत असत. याकाळात त्यानं फिर्यादी महिलेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मार्च 2017 मध्ये आरोपी गुप्ता वर्ध्याला पोहोचले आणि मंगला घिरणीकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. खूप चांगलं बोलून महिलेला आपल्या फसवणुकीच्या जाळ्यात ओढलं. "मी लोकांचे प्रश्न सोडवणार आहे. मला श्री साईबाबांचा आशीर्वाद आहे. शिर्डीत धर्मशाळा विकत घेण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी मला काही पैशांची गरज आहे" असं सांगून मोठ्या रकमेनं फसवणूक केली.


पैसे परत करण्यास आरोपीची टाळाटाळ 


आरोपी गुप्ता यांच्या बोलण्यावर निवृत्त मुख्याध्यापिका मंगला बिरणीकर यांना विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी शिर्डीतील धर्मशाळेच्या बांधकामासाठी पैसे देण्याचं ठरवलं. परिणामी 15 मार्च 2017 ते 2018 या कालावधीत वेळोवेळी महिलेनं गुप्ता यांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले. महिलेनं तिच्या स्टेट बैंक ऑफ इंडिया, ICC बँक, बँक ऑफ इंडिया शाखा वर्धा खात्यातून 65 लाख रुपये आणि 26 मे 2018 रोजी महिला नागपूर येथे असताना राजशेखर गुप्ता याला नगदी 11 लाख रुपये दिले. एकूण 76 लाख आरोपीकडे देण्यात आले होते. पैसे जमा केल्यानंतर महिलेनं धर्मशाळा दाखविण्यास सांगितलं. मात्र ते दाखविण्यासाठी तो टाळाटाळ करू लागला. फसवणुकीच्या उद्देशानं महिलेला खोटे हॉटेल दाखविण्यात आलं. संशय आल्यावर त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र आरोपी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर आरोपीविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी राजशेखर गुप्तावर गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी अधिक तपास करणार असल्याची माहिती आहे.