Maharashtra Shirdi Crime News : साईबाबा (Shirdi) संस्थानाच्या द्वारावती भक्तनिवासाच्या नावानं फेक वेबसाईट तयार करून रूम बुकींगच्या नावाखाली भाविकांची फसवणुक करून आर्थिक लूट करणाऱ्या एका अज्ञाताविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत 2 रुपये विक्री असणाऱ्या उदी पाकीटची 40 पाकीट 7 हजारांना आग्रा येथील भक्ताला विकणाऱ्या एका ठगाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


एका वेबसाईटवर मोबाईल क्रमांक देऊन शिर्डीत द्वारावती भक्तनिवासात रूम देतो, अशी वल्गना करणाऱ्या एका भामट्यानं अनेक भाविकांची आर्थिक फसवणुक केल्याचं भाविकांच्या तक्रारीनंतर उघडकीस आलं आहे. मुंबई येथील जय शर्मा या भाविकानं फेक वेबसाईट असलेल्या क्रमाकांवर ऑनलाइन पैसे भरून रूम बुक केली. मात्र शिर्डीत प्र‌त्यक्ष आल्यानंतर अशी कोणतीही रूम बुक नसल्याचं भक्तिनिवासच्या वतीनं सांगितल्यानंतर आपली फसवणुक झाल्याचं भक्तांच्या लक्षात आलं. त्यानंतर भाविकानं सदर बाब संस्थानच्या निदर्शनास आणून दिली. संस्थान प्रशासनानं भाविकांच्या तक्रारीची दखल घेत आयटी विभागाच्या वतीनं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


दुसऱ्या एका घटनेत आग्रा येथून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकाची दिशाभूल करून एका भामट्यानं 40 रुपयांची उदी पॅकेट चक्क 7 हजार रुपयांना विकून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शिर्डीतील अनेक दुकानांमध्ये हे पॅकेट 1 ते 2 रुपयांना सहज मिळतात. मात्र आग्रा येथील या साईभक्तांच्या भावनांचा फायदा घेत आणि त्याची दिशाभूल करून एका भामट्याने 1 ते 2 रुपयांना मिळणारं उदी पॅकेट प्रत्येकी 175 रुपयांना विकलं. 40 उदी पॅकेटसाठी या भामट्यानं संबंधित भाविकांकडून तब्बल 7 हजार रुपये उकळले आणि पसार झाला. यानंतर साईभक्त दिपेश कुमार जॉली यांनी शिर्डी पोलीस स्टेशन गाठलं. शिर्डी पोलीसांनी तत्काळ सूत्र हलवत अर्ध्या तासातंच त्या ठकबहादरास पकडून ताब्यात घेतलं. मात्र दूरवरून आलेल्या या साईभक्तांनं तक्रार नको, आपल्याला पुन्हा येण्यासाठी मोठी अडचण होईल असं सांगत पैसे मिळाल्याचं समाधान मानलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :