सांगली : वाळवा तालुक्यातील पेठनाका येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून 16 लाख 30 हजार रुपये किंमतीचे कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या नायजेरियन तरुणास इस्लामपूर पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे 164 ग्रॅमच्या कोकेन कॅप्सुल मिळून आल्या. त्या हस्तगत करून आरोपीस अटक करण्यात आली. एडवर्ड जोसेफ इदेह( 35, मुळ रा.नायजेरिया, सध्या रा.बंगळुरू) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षकांना गोपनीय सूत्रांमार्फत यााबाबतची माहिती मिळाली होती. 


पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये एक संशयीत कोकेन अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. रविवारी रात्री पोलीसांनी पेठनाका येथील न्यू मणिकंडन हॉटेलजवळ सापळा लावला. पुणे ते बंगळुरू जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्स बस क्रमांक के.ए. 51 ए जी 1457 मधून एडवर्ड हा उतरत होता. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या काळया रंगाच्या बॅगमध्ये एक सनसिल्क ब्लॅकशाईन शाम्पूची 650 मिली मापाची काळया रंगाची बाटली आढळून आली. त्यामध्ये कोकेन अंमली पदार्थाच्या 15 कॅप्सुल गोळ्या मिळून आल्या. हे कोकेन सुमारे 16 लाख 30 हजार रुपये किंमतीचे आहे.


 एडवर्ड इदेह विरुध्द एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 25 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वाघवाडी फाटा येथे बसने मुंबई ते बंगळुरू प्रवास करीत 11 लाख रुपयांचे कोकेन घेऊन जाणाऱ्या टांझानियाच्या तरुणास पोलीसांनी जेरबंद केले होते. त्याच्याकडे 109 ग्रॅम कोकेन मिळाले होते. दरम्यान एका महिन्याच्या अंतरात हा दुसरा परदेशी तरुण कोकेन घेवून जाताना पोलीसांच्या जाळयात सापडला आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्वाचा बातम्या