Crime News :  एका 20 वर्षीय युवकाच्या हत्या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी हे दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी असल्याचे समोर आले आहे. चेन्नईमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झालेला युवक हा तरुणींना त्यांचे खासगी फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करत होता. ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या मुलींनी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एकाच्या मदतीने हत्येचा कट रचला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 


'एबीपी नाडू'ने दिलेल्या वृत्तानुसार, हत्या झालेल्या 20 वर्षीय युवकाचे नाव प्रेमकुमार आहे. प्रेमकुमार हा रोजंदार कामगार रविचंद्रन यांचा मुलगा आहे. रेडहिल्स भागात त्याच्यावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ला झाला तेव्हा प्रेमकुमारसोबत दुचाकीवर आलेल्या त्याच्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढला आणि प्रेमकुमारच्या पालकांना याची माहिती दिली. 


पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत वंडलूर येथील ओट्टेरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन मुलींना अटक केली आहे. 


अल्पवयीन आरोपी मुलींनी सांगितले की, प्रेमकुमारने अनेक मुलींशी मैत्री केली होती. मैत्रीच्या जाळ्यात अडकवल्यानंतर प्रेमकुमार या मुलींना अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून पैसे उकळत असे. आरोपी मुलींनीदेखील प्रेमकुमारला दीड लाख रुपये दिले होते. त्यानंतरही प्रेमकुमार आणखी पैशांची मागणी करत होता. 


असा रचला हत्येचा कट


प्रेमकुमारच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या मुलींनी इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या एका विद्यार्थ्याला प्रेमकुमारकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्यानंतर तिघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. आणखी पैसे देतो या कारणाने या दोन्ही मुलींनी प्रेमकुमारला रेडहिल्समध्ये बोलावले. त्यावेळी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलाने इतर काही जणांसोबत प्रेमकुमारवर हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 


हल्लेखोरांनी प्रेमकुमारला गुम्मीडीपुंडी येथे नेले आणि तेथील एका खोलीत त्याला डांबले व त्याचा छळ केला. त्यानंतर त्यांनी एचांकटूमेडू गावात त्याची हत्या केली आणि जवळ एका मोकळ्या जागेत त्याला पुरले. पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास सुरू आहे.