Maharashtra Pune Crime News : महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना आपण रोज ऐकतो, वाचतो. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी एक तरुणी अभ्यासिकेत जाताना एका अज्ञात इसमानं तिचा विनयभंग केल्याचं उघडकीस आलं आहे. तरुणी अभ्यासिकेत जात असताना आरोपीनं रस्त्यात तिला गाठलं आणि तिच्यासमोर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ही घटना 10 जानेवारी रोजी घडली असून 25 वर्षीय तरुणीनं याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


पीडित तरुणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतेय. 10 जानेवारी (रविवारी) सकाळी अभ्यासिकेत जाण्यासाठी निघाली. त्यावेळी एका अज्ञात इसमानं तरुणीचं लक्ष वेधून घेतलं. तरुणीचं लक्ष इसमाकडे जाताच, त्यानं अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच, शरीरसंबंध ठेवण्याचीही इच्छा व्यक्त केली. एवढंच नाहीतर या आरोपीनं काही अंतरापर्यंत तरुणीचा पाठलागही केला. घाबरलेली तरुणी तिथून निघून गेली. तरुणीनं याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. अखेर तब्बल दोन महिन्यांनी या पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


दरम्यान, या सर्व प्रकारानंतर घाबरून गेलेली पीडित तरुणी अनेक दिवस गप्प राहिली. त्यानंतर मात्र तिनं या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. तिनं पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेची तक्रार ऐकून घेऊन सदर प्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या कृत्यामुळं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :