Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात मोबाईल चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच नाशिक पोलिसांनी नागरिकांच्या हातातून मोबाईल खेचून पळणाऱ्या टोळीस  गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून तब्बल चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


गेल्या काही दिवसांत मोटरसायकल, लॅपटॉप, मोबाईल चोरीच्या (Mobile Theft) घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. चोरटे सर्रास दिवसाढवळ्या नागरिकांची नजर चुकवून अलगदरित्या अशा चोऱ्या करत असल्याचे पोलिसांचं म्हणणे आहे. त्यामुळे अनेकदा मोबाईल, लॅपटॉप शोधणे अवघड होत आहे. अशातच 04 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शहरातील गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरात एक व्यक्ती मोबाईलवर पाय बोलत जात असताना मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून ते पळून गेले होते. या प्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्याच्या (Sarkawada Police) गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


दरम्यान मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. चेतन निंबा परदेशी, शशिकांत सुरेश अंभोरे, विजय सुरेंद्र श्रीवास्तव अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या संशयितांकडून पोलिसांनी शहरातून विविध ठिकाणाहून चोरलेले 22 मोबाईल आणि गुन्ह्यांत वापरलेली मोटरसायकल असा एकूण चार लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांची आणखी चौकशी केल्यानंतर आणखी एका संशयिताचे नाव समोर आले. त्यानुसार निखिल अर्जुन विंचू यास ताब्यात घेत आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. 


दरम्यान या गुन्ह्याचा तपास घेतला जात असून संशयितांनी महाविद्यालयीन विद्यार्थी असून कॉलेजमध्ये मौज मजा करण्यासाठी पैसे मिळावे या हेतूने गुन्हे केल्याचे समोर आले. संशयितांना अटक केल्यानंतर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात असलेले सात गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे आदींच्या पथकाने केली. 


फोन करण्याच्या बहाण्याने... 


नाशिक शहरात अनेकदा चोरट्यांनी चोरी करण्याच्या अनेक क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत. फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन घेऊन पोबारा करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जात असताना अनोळखी व्यक्तीकडे मोबाईल देताना सावधगिरी बाळगा किंवा रस्त्याने जाताना मोबाईलवर बोलत असल्यास काळजीपूर्वक इतरही हालचालींवर लक्ष ठेवा. अन्यथा मोबाईल चोरी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.