Latur Crime News: लातूर जिल्ह्यात (Latur District) एक संतापजनक प्रकार समोर आला असून, पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगी झाली म्हणून आईनेच आपल्या तीन दिवसांच्या मुलीचा गळा दाबून हत्या (Murder) केली आहे. या धक्कादायक घटनेने लातूर हादरला असून, याप्रकरणी निर्दयी आईविरोधात गातेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील होळी (ता. लोहारा) येथील रेखा किसन चव्हाण ही महिला सध्या लातूर तालुक्यातील एका वस्तीवर वास्तव्याला आहे. यापूर्वी तिला एक मुलगी झाली होती. त्यामुळे आता मुलगा होईल अशी अपेक्षा रेखाला होती. दरम्यान ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली होती. तर काटगाव वसंतनगर तांडा नजीकच्या कासार जवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात 27 डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी दाखल झाली होती. दरम्यान, आरोग्य केंद्रात तिने गोंडस मुलीला जन्म दिला. पण दुसऱ्यावेळीही मुलगी झाल्याने रेखा चव्हाण नाराज होती. 


आरोग्य केंद्रातचं रुमालाने बाळाचा गळा घोटला 


पहिली मुलगी झाल्यानंतर चव्हाण दाम्पत्याने पुन्हा मुलासाठी प्रयत्न केला होता. मात्र, दुसऱ्यावेळीही मुलगीच झाली. मुलगी नको असल्याने मातेनेच प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन दिवसांनंतर 29 डिसेंबर 2022 रोजी रुमालाने बाळाचा गळा दाबून हत्या केली. घटनेनंतर गातेगाव पोलिसांनी रेखा चव्हाणला अटक केली. तिला लातूरच्या न्यायालयात शनिवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने रेखा चव्हाण हिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 


कुटुंबातील सदस्यांना बसला धक्का...


रेखा चव्हाण दुसऱ्यांदा गरोदर असल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते. तर याबाबत नातेवाईकांना देखील माहित होते. मात्र दुसरी मुलगी झाल्याने रेखाने तीन दिवसांच्या बाळाचा स्वतःच गळा दाबून जीव घेतल्याचे समोर आल्याने तिच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नातेवाईकांना देखील धक्काच बसला. रेखा एवढ्या टोकाचे पाऊल उचलेल यावर अनेकांना विश्वास बसत नव्हता. 


कुटुंब उघड्यावर! 


रेखा चव्हाणला आधीच एक मुलगी होती. तर आपल्या पती आणि मुलीसह ती लातूरमध्ये राहत होती. सर्व काही सुरळीत सुरु होते. त्यात घरात आणखी एक नवीन सदस्य येणार होतं. पण मुलगी झाल्याने रेखाने तिचा जीव घेतला. त्यामुळे तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. आता रेखा जेलमध्ये असून, पहिल्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्या पतीवर आली आहे. रागाच्या भरात रेखाने उचलेल्या टोकाचा पाऊलमुळे तीच संपूर्ण कुटुंब आता उघड्यावर पडलं आहे.