Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) नारळीबाग परिसरात एका संतापजनक प्रकार समोर आला असून, किरकोळ कारणावरून झालेल्या दोन कुटुंबांतील वादात कुत्रीच्या डोक्यात फावडे मारत हत्या केली आहे. भांडण सुरु असताना कुत्री भुंकली त्यामुळे तिचा जीव घेतल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी भांडणासोबतच कुत्रीचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे मृत कुत्रीने चार दिवसांपूर्वी सात गोडस पिलांना जन्म दिला होता. तर संदीप भिसे, सचिन भिसे, आश्विनी भिसे, राणी भिसे (सर्व रा. नारळीबाग) अशी आरोपींची नावे आहेत.
प्रीती कांबळे यांनी सिटी चौक पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 31 जानेवारीला रात्री सव्वाआठ वाजता आरोपी संदीप भिसे, सचिन भिसे, आश्विनी भिसे आणि राणी भिसे हे सर्वजण कांबळे यांच्या घरी गेले. तेव्हा कांबळे यांची पाळीव कुत्री त्यांच्यावर भुंकली. तेव्हा सचिन भिसे याने दांडा असलेले फावडे कुत्रीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यात कुत्री जमिनीवर कोसळली. काही वेळातच कुत्रीचा जीव गेला. विशेष म्हणजे या कुत्रीने चार दिवसांपूर्वीच सात पिलांना जन्म दिला होता. त्यामुळे या घटनेनंतर कुटुंबीयांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, कुत्रीचा जीव घेतल्यानंतर भिसे कुटुंबीयांनी कांबळे यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना घरात घुसून मारहाण केली. तुम्ही आमची सुपारी दिली का?, रात्री आम्हांला लोकांनी मारहाण केली, असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी प्रीती कांबळे यांनी सिटी चौक पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, संदीप भिसे, सचिन भिसे, आश्विनी भिसे, राणी भिसे (सर्व रा. नारळीबाग) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परस्परविरोधी गुन्हा दाखल...
दरम्यान प्रीती कांबळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असतानाच भिसे कुटुंबीयांनी देखील पोलिसात धाव घेत कांबळे कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सचिन भिसे यांच्या तक्रारीवरून रितिका निकाळजे, अमोल महाले, प्रीती कांबळे, सुनीता निकाळजे यांच्याविरुद्धही मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ज्यात 30 जानेवारीला रात्री 8 वाजता भिसे यांनी भाऊसाहेब खेत्रे यांना राम-राम घातला होता. त्या कारणावरून आरोपींनी भिसे यांच्यासोबत वाद घातला. त्यांना मारहाण केली. 31 जानेवारीला दुपारी त्यांची पत्नी, वहिनी यांनाही आरोपींनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे भिसे यांच्या तक्रारीवरून रितीका निकाळजे, अमोल महाले, प्रीती कांबळे, सुनीता निकाळजे (सर्व रा. धनमंडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महत्वाच्या इतर बातम्या: