मुंबई :  संत तुकाराम महाराजांबद्दल (Tukaram Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Maharaj) यांना आता उपरती झालीय. तुकाराम महाराज हे महान संत असून तेच आपले आदर्श आहेत, असं म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी हात जोडून महाराष्ट्राची माफी मागितली आहे. वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला गेला. त्यामुळे शब्द मागे घेत असल्याचं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.


अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या तुकोबांसंदर्भात बोलताना धीरेंद्र महाराजांची जीभ घसरली आणि नव्या वादाला तोंड फोडलं.  जगतगुरू संत तुकाराम  महाराजांच्या पत्नीवर टिपण्णी केली. तुकोबारायांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लीन झाले, असं वादग्रस्त वक्तव्य या बाबांनी केलं होतं.


महाराजांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे धीरेंद्र महाराजांनी लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी, आचार्य तुषार भोसले यांनी केली  होती. तर तुकोबारायांच्या पत्नीबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागावी.  ज्यानं लग्नचं केलं नाही त्याला संसार काय कळेल. असा अपमान करणाऱ्यांची टाळकी दुरूस्त करावी लागतील, असा इशारा अमोल मिटकरी यांनी बागेश्वर महाराजांना दिला होता. तोंड दिलं म्हणून कारण नसताना बोललंच पाहिजे, असा दुराग्रह संतांचा नसावा, चूक झाली असेल तर माफी मागणं पण एक पुरुषार्थ आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.  


कोण आहेत धीरेंद्र महाराज?


धीरेंद्र रामकृपाल गर्ग  यांचा जन्म 1996 साली झाला. मध्यप्रदेशातल्या छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म  झाला. वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग.  तीन भावंडांमध्ये धीरेंद्र सर्वात मोठे. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले आहे. आजोबा हनुमान मंदिराचे पुजारी होते. त्यांच्या तालमीतच धीरेंद्रही महाराज  बनले आणि त्याने आपले दरबार भरवायला सुरुवात केली. 


नागपूरमध्ये आलेल्या धीरेंद्र महाराजांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव (Shyam Manav) यांनी खुलं आव्हान दिलं. पण ते आव्हान न स्वीकारताच नागपूरमधून बाहेर पडून मध्यप्रदेशमध्ये जाऊन त्यांनी प्रतिआव्हान दिलं. पण इतकं होऊनही हा बाबा थांबले नाहीत.  आणि त्याने महाराष्ट्राच्या आराध्य असलेल्या तुकोबांवर दैवतावरच शेरेबाजी केली आहे.  संतांच्या रचनांनी  संतांच्या विचारांनी या महाराष्ट्राला समृद्ध केले आहे. ती महाराष्ट्राची दैवते आहेत आणि म्हणूनच या महाराजांविरोधात संतापाची लाट उसळली होती.