Nandgoan Police : नांदगाव पोलिसांच्या (Nandgaon Police) हातावर तुरी देऊन संशयिताने पोलीस ठाण्यातून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील नाग्या साक्या धरणावरील कृषी पंपासाठी वापरल्या जाणाऱ्या केबल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी संशयिताला न्यायालयातून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर संशयिताने पोलिसांच्या हातावर तुरी देवून पोलीस ठाण्यातूनच धूम ठोकल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.


नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत रोजच अनेक छोट्या मोठ्या चोरीच्या (Theft) घटना उघडकीस येतात. केबल चोरी, कंपनी साहित्य चोरी, विहीर, धारण मोटार चोरी या घटनांमध्ये स्थानिक सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक करण्यात येते. अशावेळी पोलिसांकडून कडक कारवाई करून संशयितांना धडा शिकवला जातो. मात्र नांदगावमध्ये (Nandgaon) एका संशयिताने पोलिसांनाच गुंगारा दिला आहे. हिरामण धोंडीबा गांगुर्डे असे या फरार झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, संपूर्ण पोलीस स्थानक या आरोपीच्या शोधात लागले मात्र सायंकाळी उशिरापर्यंत हा संशयित आरोपी मिळून न आल्याने त्यास शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले.


याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील नाग्या - साक्या धरणातील (Nagya Sakya Dam) कृषी पंपाच्या तांब्याच्या केबलची चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 7 कृषीपंपाच्या 74 हजार रुपयांच्या केबल चोरी प्रकरणी 379 कलमाद्वारे तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी हिरामण धोंडीबा गांगुर्डे या तिसऱ्या संशयिताला ताब्यात घेतले होते. आज या संशयितास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या आरोपीस न्यायालयातून पोलीस ठाण्यात आणले असता आरोपीने पोलिसांची नजर चुकवून तेथून पळ काढला.


पोलिसांनाच दिला गुंगारा 


नाग्या-साक्या धरण परिसरातून कृषी पंपासाठी लागणाऱ्या केबल चोरी प्रकरणात नांदगाव पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून तपासात दिंडोरी येथील जाणून येथील राहणारा हिरामण धोंडीबा गांगुर्डे याचे नाव समोर आले होते. त्यानुसार नांदगाव पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली होती. संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस ठाण्यात असताना त्याने पोलिसांची नजर चुकून गेटमधून पोबारा केला. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी या संशयित आरोपींची शोधासाठी मागावर होते. मात्र तो मिळून न आल्याने पोलिसांसमोर या आरोपीला शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या संशयित आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.