Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील काही भागात सर्रास मोठे गुन्हे घडताना दिसून येत आहेत. खून, प्राणघातक हल्ले, महिलांचा विनयभंग अशा घटना घडत आहेत. मात्र याचे लोन आता ग्रामीण भागांतही पसरू लागले आहे. इगतपुरी तालुक्यातील अडसरे येथील युवतीचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. अत्याचार करून युवतीला संपवत अज्ञात संशयिताने पळ काढल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 


इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील अडसरे बु. येथील शेत शिवारात तीन दिवसांपूर्वी एका युवतीचे प्रेत (Crime) आढळून आले होते. दरम्यान, या युवतीवर अत्याचार करून धारदार शस्त्राने तिचा खून (Murder) करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून कसून चौकशी केली जात असल्याची माहिती घोटी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली. या घटनेने तालुका हादरला असून घटनेची उकल करण्याचे आव्हान घोटी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. याप्रकरणी घोटी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरात असलेल्या अडसरे बु या गावातील शेतात भाताच्या गंजीजवळ एका 27 वर्षीय युवतीचे प्रेत गुरुवारी आढळून आले होते. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटलांनी घोटी पोलिसांना दिली होती. युवतीचा मृतदेह हा कोणाचा आणि तिच्या मृत्यूचे कारण नेमके काय? याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते. प्रारंभी घोटी पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, युवतीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून धारदार शस्त्राने तिच्यावर वार करून तिला जीवे ठार मारल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे तर्कवितर्क केले जात असून चौकशीची मागणी होत आहे.


इगतपुरी तालुक्यातील अडसरे येथील एका तरुणीवर झालेला अत्याचाराचा प्रकार अत्यंत निदनीय असून, त्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी त्वरित वरिष्ठ पातळीवर तपास व्हावा. या प्रकरणात अनेक आरोपी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी दिली. 


युवतीच्या आईने दिली फिर्याद


मयत युवतीची आई सीताबाई मारुती चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिसात याबाबत अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. या गंभीर घटनेच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, घोटी पोलिसांचे पथक संशयितांच्या मागावर आहेत. घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर, सहायक निरीक्षक श्रद्धा गंधास, सहायक पोलीस निरीक्षक संजय कवडे पोलिस हवालदार राऊत, सुहास गोसावी आदी पुढील तपास करीत आहेत.