Maharashtra Nashik Crime : नाशिक (Nashik) शहर दिवसेंदिवस गुन्हेगारींची परिसीमा गाठताना दिसून येत आहे. रोजच खुनाच्या घटनांनी नाशिक शहर हादरत आहे. नवरा बायकोचे वाद नित्याचे झाले आहेत. यातूनच अनुचित घटना घडत आहे. शहरातील सातपूरच्या (Satpur) शिवाजीनगर भागात मोलमजुरी करून जगणाऱ्या नवरा बायकोत भांडण झाले. या भांडणातून नवऱ्याने बायकोला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील शिवाजीनगर (Shiwajinagar) भागातील सातीअसरा, वीटभट्टीजवळ मयत मीरा पिनू पवार आणि पिनू सोमनाथ पवार हे दाम्पत्य मोलमजुरी करून राहत होते. यातील नवऱ्यास दारूचे व्यसन असल्याचे ते रोज दारू पिऊन भांडत होते. पिनूची पत्नी मीरा ही पिण्यासाठी इतर कोणासोबत गेल्यास पिनू आणि मीरामध्ये भांडण होत होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीही अशाच भांडणातून दोघांमध्ये मोठा वाद झाल्याने रागाच्या भरात पिनू पवार याने मीराला लाकडी दांड्याने मारहाण करत, तिच्या डोक्यावर लाकडी दांड्याने (Wife Murder) जोरदार प्रहार केला. यात गंभीर दुखापत झाल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 


दरम्यान, रुग्णालयात दाखल करताना मीरा घरात चक्कर येऊन पडल्याने, तिला रुग्णालयात दाखल करीत असल्याचा बनाव संशयितांने केला होता. त्यामुळे सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनात मयत मीराच्या अंगावर आणि डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, मीराचा पती पिनू पवार यानेच तिचा खून केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी गंगापूर पोलीस ठाण्यात पिनू पवार याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.


मयत मीरा पवार हिच्या डोक्यावर संशयिताने लाकडी दांड्याचा जोरदार प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर येते. मयत आणि तिचा पती दोन्ही मोलमजुरी करून राहत असताना, त्यांच्यात झालेल्या भांडणातून ही घटना घडल्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी तपस सुरू असून आणखी काही तपासात समोर येईल, अशी शक्यता असल्याचे गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी सांगितले. 


नाशिकचं वातावरण बिघडतंय... 


नाशिक पोलिसांसमोर शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी आव्हान ठरत आहे. एक खुनाचा गुन्हा घडत नाही तोच दुसरा गुन्हा घडत आहे. एका गुन्ह्याची उकल होत असताना दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. शिवाय सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरत आहे. दिसवाढवल्या खून, हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले होत असल्याने सामान्य नागरिकांची सुरक्षितता देखील वाऱ्यावर आहे. हे झालं शहरातलं वातावरण, मात्र अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे घरातलं वातावरण देखील बिघडत असून यामुळे वाद वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच मारहाण, खून असे अनुचित प्रकार घडत असल्याचे समोर येत आहेत.